महापालिकेच्या वडाळागावातील रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:33 AM2018-06-21T00:33:19+5:302018-06-21T00:33:19+5:30
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते. गावात सुमारे दहा हजार लोकसंख्या आहे तसेच काही अंतरावरच राजीवनगर झोपडपट्टी असून, हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विविध आजारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा जाकीर हुसेन रुग्णालय येथे ये-जा करावी लागते. त्यासाठी रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत असल्यामुळे मजुरी करणा-यांना मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागते. सुमारे पंचवीस वर्षांपासून मनपा रुग्णालयाची प्रतीक्षा नागरिकांना होती. अखेर रहिवाशांच्या मागणीची दखल व आवश्यकता लक्षात घेत शंभर फुटी रस्त्यालगत महापालिकेचे रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यानुसार रुग्णालयाचे बांधकाम एक वर्षापूर्वी पुन्हा करण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत रुग्णालयाचे लोकार्पण झाले नाही. काही किरकोळ कामाअभावी लोकार्पण होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णालय शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
सभागृहाची देखभालीअभावी दुरवस्था
काही औषधे अशी आहे की ती सरकारी रुग्णालयातच मिळतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मनपा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगतच मनपानेच बांधलेल्या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. चोरट्यांनी दारे, खिडक्या नेणे सुरू केले आहे. तसेच सभागृहात गाजरगवत व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने खंडराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. त्याची पुनरावृत्ती मनपा रुग्णालयाबाबत होऊ नये. गेल्या पंधरा दिवसांपासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायाच्या सांधेदुखीने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. गावातील मनपाचे रु ग्णालय सुरू झाले असते तर रुग्णांची सोय झाली असती असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच गावातील उघड्या गटारींमुळे नेहमीच साथीचे आजार पसरत असतात.