भोजापूर धरण पाणलोट क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:57+5:302021-09-05T04:17:57+5:30
नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली ...
नांदूरशिंगोटे : दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीत धरणात फक्त ४० दशलक्ष घनफूट पाण्याची नवीन आवक झाली आहे. धरणात २४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहेत. परतीच्या पावसाने तरी भोजापूर धरण भरेल अशी अपेक्षा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.
म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरणाची निर्मिती केली असून धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती व पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांतील २१ गावे धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणात पाण्याची आवक झालेली नसून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसावरच साठा वाढला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात धरणात ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तीन महिन्यांच्या कालावधीत १३ टक्के पाणीसाठा वाढला असून, धरण परिसरात अवघा साडेतीनशे मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण परिसरात झालेल्या पावसाने डोंगराचे पाणी वाहून धरणात आल्याने आजमितीला धरणात ८५ दशलक्ष घनफूट पाणी आहेत. गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या दोन वर्षांपासून भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत होती. तसेच तब्बल दोन महिने धरणाच्या पाण्यातून विसर्ग सुरू असल्याने लाभक्षेत्रातील बंधारे पूर्णपणे भरले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांनंतर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. दोन वर्षांपासून सातत्याने भोजापूर धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणात आज फक्त २४ टक्के जिवंत पाणीसाठा असला तरी आगामी काळात होणाऱ्या मोठ्या पावसाने या पाणीसाठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून कसाबसा तग धरून आहे. दररोज ढगाळ व पावसाचे वातावरण तयार होते, मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पावसाअभावी परिसरातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पाऊस लांबल्यास सर्वांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची वेळ येऊ शकते.
इन्फो...
भोजापूर धरणाच्या पाण्यावरच लाभक्षेत्रातील शेतीव्यवसाय अवलंबून आहेत. दरवर्षी रब्बी हंगामात धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. तसेच धरणातून मनेगावसह १९ गावे व कणकोरीसह पाच गावे नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे हजारो लोकांची तहान भागविण्याचे काम धरण करीत आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम धरणातून सुरू आहे.
फोटो - ०४ भोजापूर डॅम
भोजापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा.