भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:12+5:302021-06-29T04:11:12+5:30

नांदूरशिंगोटे : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने सिन्नर तालुक्यातील भोजापूरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम ...

Waiting for rain in the catchment area of Bhojapur dam | भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा

भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने सिन्नर तालुक्यातील भोजापूरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भोजापूर धरणात सध्या ४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने पाठ फिरवल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक असल्याने तूर्तास पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर पाणलोट क्षेत्र व नांदूरशिंगोटे परिसरात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाने वेळेवर हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. गतवर्षी भोजापूर धरण भरण्यापूर्वीच परिसरातील बंधारे तुडुंब भरले होते. त्यानंतर भोजापूर धरण ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे परिसरातील बहुतांश ओढे, नाले शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. लहान-मोठ्या नद्यादेखील दुथडी वाहिल्या होत्या.

-----------------------------

मृग नक्षत्राची पाठ, पेरण्या रखडल्या

गेल्या वर्षीच्या दमदार पावसामुळे भूजल पातळीदेखील कमालीची वाढली होती. त्यामुळे कूपनलिका आणि विहिरींच्या पाणीपातळीदेखील कमालीची वाढ झाली. या पाण्यावरच शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम काढला. तर कोठेच पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे धरणांतील पाण्याची मागणीदेखील रोडावली होती. यावर्षी धरण परिसरात मान्सूनपूर्व व रोहिणी नक्षत्राने दमदार हजेरी लावली. मात्र, मृग नक्षत्राने दडी मारली. त्यामुळे धरण परिसरात १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभक्षेत्रातदेखील पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची नवीन आवक थांबून, पेरणीदेखील रखडली आहे.

Web Title: Waiting for rain in the catchment area of Bhojapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.