धरणक्षेत्रात पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:19 AM2019-07-01T01:19:13+5:302019-07-01T01:19:33+5:30
: शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस होऊ शकला नाही. धरणात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकवर पाणीकपातीची वेळ आली
नाशिक : शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस होऊ शकला नाही. धरणात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकवर पाणीकपातीची वेळ आली असताना समूहात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने नाशिकवरील पाणीसंकट कायम आहे. मागील आठवड्यात १३.६५ द.ल.घ.फू. असलेला साठा १३.३५ द.ल.घ.फू.वर आला असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रविवारी (दि.३०) दिवसभरात पाणलोट क्षेत्रात केवळ ४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. शहरातही सकाळपासून पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव दिवसभर सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.९ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
मान्सून सरींचा वर्षाव शहरासह जिल्ह्यात सुरू झाला आहे; मात्र अद्याप पावसाने जोर धरला नसल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत १२, तर इगतपुरी तालुक्यात २३ आणि पेठ तालुक्यात सर्वाधिक १२७ मि.मी. इतका पाऊस रविवारी नोंदविला गेला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अंबोली येथे २४, तर त्र्यंबक मध्ये दिवसभरात केवळ ५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद होऊ शकली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला नसल्याने धरणाचा जलसाठा ७५२ दशलक्ष घनफूट इतका असून १३.३५ टक्क्यांपर्यंत पाण्याची पातळी घसरली आहे.
शनिवारच्या तुलनेत रविवारी शहरात दिवसभर हलक्या, मध्यम सरींचा वर्षाव सुरू होता. शनिवारी दिवसभरात केवळ १.२ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता. त्या तुलनेत रविवारी ३.९ मि.मी.पर्यंत पाऊस नोंदविला गेला. शहरात या हंगामात अद्याप केवळ १०७.६ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.
मृग नक्षत्राच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले असले तरी पावसाने जोर धरला नसून आता आर्द्रा नक्षत्राची सर्वांना आशा लागली आहे. येत्या तीन जुलैपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास शहरावरील पाणीटंचाई व जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट दूर होण्यास मदत होईल.
दिवसभर रिमझिम वर्षाव
रविवारी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. त्यानंतर पावसाने शहर व परिसरात उघडीप घेतली. दुपारपासून पुन्हा रिमझिम हलक्या सरींचा वर्षाव अधूनमधून सायंकाळपर्यंत सुरू च होता. यामुळे रविवार असूनही शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळीही शुकशुकाट पहावयास मिळाला तर रेनकोट, छत्री खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्रही शहरातील तिबेटियन मार्केट, मेनरोड, कानडे मारुती लेन परिसरात नजरेस पडले.