ग्रामीण भगात लालपरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:57 PM2021-01-30T16:57:17+5:302021-01-30T16:57:47+5:30
देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवासी वाहतूक बंद करत, एसटीने प्रवास करण्याचा निर्णय घेत, आदर्श निर्माण करणाऱ्या वाखारी गावात १५ दिवसांपासून नियमित बससेवा सुरू झाली आहे.

देवळा येथून राज्य व आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कोरोनामुळे बंद असलेली शाळा व महाविद्यालये आता सुरू झाली असून, ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी देवळा येथे शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु ग्रामीण भागात अद्याप बससेवा सुरू नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची, तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय रहात नाही. यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीस चालना मिळत आहे. ग्रामीण भागात प्रवासी सांगतील, त्या ठिकाणी खासगी वाहन उभे केले जाते, यामुळे त्यास पसंती मिळते.
तालुक्यातील अनेक गावात बससेवा अपुरी आहे. यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांना वेळेवर बससेवा न मिळाल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागते. बससेवा वाढविण्याची मागणी केली असता, एसटी महामंडळ त्या भागातील खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंद करण्याची अट ग्रामस्थांना घालते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला या गावांना बस सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाला सर्वाधिक स्पर्धा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांशी करावी लागत आहे.
देवळा तालुक्यात लोहोणेर, उमराणे, मेशी, खर्डा, देवळा आदी प्रमुख गावासह इतर गावांतीत अनेक बेरोजगार तरुणांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी खासगी वाहने विकत घेऊन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. कोरोना काळात मंदावलेला खासगी प्रवासी वाहतूक व्यवसायाला ग्रामीण भागातील बंद असलेल्या बससेवेमुळे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. सटाणा व कळवण आगाराने देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील त्यांच्या नियमित बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.