आरटीई प्रवेशासाठी वेळापत्रकाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:32 AM2019-04-01T01:32:27+5:302019-04-01T01:32:41+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे.
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असून, आतापर्यंत संकेतस्थळावर पुढील प्रक्रियेविषयी कोणतीही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी आपल्या पाल्याचा अर्ज दाखल करणाऱ्या पालकांना पहिल्या सोडतीसह वेळापत्रकाची प्रतीक्षा पालकांना लागली आहे.
आरटीई अंतर्गत अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी वयोमर्यादेतही वाढ करून २२ मार्चपर्यंत असलेली मुदत आठ दिवस वाढून ३० मार्च केली होती. या वाढीव मुदतीत जवळपासून २ हजार अर्ज दाखल करण्यात आले. ५ हजार ७६४ जागांसाठी यंदा तब्बल पट म्हणजे १४ हजार ९९५ अर्ज संकेतस्थळावर दाखल झाले आहे. अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाइल अॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ४६ अॅपद्वारे सादर झाले आहेत. दरम्यान, पहिलीच्या प्रवेशासाठी पूर्वनियोजित वयोमर्यादेत वाढ देण्यासोबतच शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्यासाठी २२ मार्चची मुदत वाढवून ३० मार्च केली होती. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठीची मुदत शनिवारी संपली असून, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी (दि.१) सोडतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
अॅपद्वारे अर्ज प्रक्रिया क्लिष्ट
शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाइन संकेतस्थळांसोबतच पालकांना घर बसल्या अर्ज भरता यावा, या उद्देशाने मोबाइल अॅपही सुरू केले आहे. मात्र, मोबाइल अॅपद्वारे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने पालकांचा गोंधळ उडाल्याने अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केवळ ४६ अर्ज मोबाइल अॅपद्वारे दाखल होऊ शकले, तर उर्वरित सुमारे १४ हजार ९४९ अर्ज आॅनलाइन पोर्टलद्वारे दाखल झाले आहेत. असे एकूण १४ हजार ९९५ अर्ज दाखल झाले असून, या सर्व अर्जदारांना आता पहिली लॉटरी आणि प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.