शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत; पालकवर्ग अजुनही संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:58 PM2020-06-15T20:58:52+5:302020-06-16T00:05:28+5:30
नांदगाव : १५ जून रोजी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या शाळा आज प्रथमच शांत आहेत. गेल्या काही वर्षांत शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना गावातले वातावरण बदलून जाते असे. यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेचा परिसर विद्यार्थीविना ओकाबोका झाला. गेले पंधरा दिवस साफसफाईच्या निमित्ताने शाळा सुरू होणार असल्याचे संकेत दिले गेले होते.
नांदगाव : १५ जून रोजी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या शाळा आज प्रथमच शांत आहेत. गेल्या काही वर्षांत शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना गावातले वातावरण बदलून जाते असे. यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेचा परिसर विद्यार्थीविना ओकाबोका झाला. गेले पंधरा दिवस साफसफाईच्या निमित्ताने शाळा सुरू होणार असल्याचे संकेत दिले गेले होते. मात्र रविवारी सायंकाळी पुढचा शासन आदेश येईपर्यंत शिक्षकांनी घरूनच आॅनलाइन डिजिटल माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करावी, असा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचा मेसेज आल्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली नाही.
--------------------------
मुलांना शाळेत पुढील सूचना येईपर्यंत बोलवायचे नाही, अशा सूचना शिक्षकांना दिल्या असून त्यांनी आॅनलाईन शिक्षण द्यावयाचे आहे. ६२ पाठ आॅनलाइन पद्धतीने झाले आहेत. आज वेगळा आदेश नसता तर १०० टक्के शिक्षक शाळेत गेले असते. पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर उपलब्ध झाली असून, दोन दिवसात त्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नंदा ठोके यांनी दिली.
शैक्षणिक दिंडी काढून, पालखी सजवून, गुलाबपुष्प देऊन, मिरवणुकीने विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश होत असे. पटसंख्या पूर्ण हजर राहावी. यासाठी शाळाशाळांत चढाओढ लागलेली असे. पहिल्या दिवशीचा पोषण आहार सकस व चवदार असावा याकडे लक्ष पुरवले जात असे. पंधरवड्यात शाळा सफाई झाली; पण आहारासाठी लागणारे तांदूळच अद्याप प्राप्त झाले नाहीत.
तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी शाळा मिळून पहिली ते बारावीपर्यंत सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी शाळातील ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अॅनड्रॉईड मोबाईल आहेत. गेले दोन महिने अनेक शाळांनी त्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. जिल्हा परिषदेच्या शाळात १६,३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून तालुकास्तरीय सर्वेक्षणानुसार केवळ ४५०० पालकांकडे स्मार्टफोन आहेत.
निर्जंतुकीकरण, सफाई केल्यानंतर शाळा सुरू होतील असा मेसेज पालकापर्यंत गेला होता. परंतु कोरोनाविषयी असलेले अनेक सामाजिक नियम कसे पाळता येतील याबद्दल शिक्षक व पालक यांच्यात संभ्रम आहे. शिक्षण विभागातले वरिष्ठ, शासकीय आदेशाची वाट बघत आहेत. शाळा केव्हा सुरू करायच्या याचे आदेश काही दिवसात निघतील, असे नाशिक शिक्षणाधिकारी यांनी कळवले आहे.