कोरोना लसींच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांनंतरही प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:43+5:302021-07-28T04:14:43+5:30
दाभाडी (नीलेश नहिरे) : कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रथमतः ६० ...
दाभाडी (नीलेश नहिरे) : कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रथमतः ६० वर्षांच्या पुढील नागरिक, त्यानंतर ४५ वर्षे आणि आता सध्याच्या घडीला १८ वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीच्या तुटवड्याअभावी सुरुवातीला विशिष्ट वयोगटाचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सध्याच्या घडीला अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्याचे सुरू असतांना ८४ दिवस उलटूनही लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या नियमावलीप्रमाणे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी सुरुवातीला २८ दिवसांचा कालावधी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर हा कालावधी वाढवीत ४५ दिवसांचा करण्यात आला. आता तोच कालावधी ८४ दिवस करण्यात आला आहे. सध्या अनेक नागरिकांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांहून अधिक झाले असून दुसरा डोस घेणे आवश्यक आहे तरीही लस उपलब्ध नसल्याने दुसरा डोस कसा घ्यावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा स्तरावरून तालुक्याला विशिष्ट संख्येइतकाच लसीचा पुरवठा होत आहे. त्यातही आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच लस उपलब्ध होते आणि तालुक्यातील प्रत्येक गावाला मोजकीच लस पोहोचत असल्याने लसीकरणाच्या दिवशी केंद्रांवर प्रचंड गर्दी व गोंधळ पाहावयास मिळत आहे. यामुळे लसीकरणाच्या दिवशी कर्मचाऱ्याला व आरोग्य अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
------------------
नियोजनाचा अभाव की लसीचा तुटवडा
जिल्हा स्तरावरून वितरित होणारी लस तालुक्यावर वितरित करताना प्रत्येक गावापर्यंत मोजक्या संख्येतच पोहोचते. इतक्या कमी प्रमाणात लस देत राहिल्यास अनेक महिने उलटूनही शंभर टक्के नागरिकांपर्यंत लस पोहोचणार नाही. विशेष म्हणजे शासन दरबाराकडून लसीचा तुटवडा आहे की, स्थानिक पातळीवर लस पोहोचत असताना नियोजनाचा अभाव आहे हेच गूढ गुलदस्त्यात आहे.
-----------------
रोषाचा सामना
गाव पातळीवर लसीकरण करताना नियोजन करणारी यंत्रणा यामधील कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर लस न मिळणाऱ्या नागरिकांकडून रोषाचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक ठिकाणी वाद व गोंधळ निर्माण होताना बघावयास मिळत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत दिसून येते.
------------------------
८४ दिवस उलटूनही लस मिळत नाही. त्यातही आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच लस गावात येत असल्याने मोठी गर्दी निर्माण होते. यामुळे अनेक नागरिक अद्यापही लसीपासून वंचित आहेत.
-दिनेश निकम, दाभाडी
--------------------
जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेल्या लसीचे तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रावर योग्य प्रमाणात वाटप करून त्यानंतर प्रत्येक गावापर्यंत ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यातही जास्त दिवस झालेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देत आहोत.
- डॉ. शैलेंद्र निकम, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव.