डांबरीकरणाची प्रतीक्षा : दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Published: October 29, 2014 10:45 PM2014-10-29T22:45:30+5:302014-10-29T22:45:46+5:30

भोजापूर खोऱ्यातील रस्त्यांची दैना

Waiting for tarpaulin: In two months, the passenger's condition due to the open on the road | डांबरीकरणाची प्रतीक्षा : दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवाशांचे हाल

डांबरीकरणाची प्रतीक्षा : दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवाशांचे हाल

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोरे परिसरातील रस्त्यांची दैना उडाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून, काही रस्त्यांची कामे रखडल्याने रस्त्यावर टाकून ठेवलेल्या खडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी भोजापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भोजापूर खोरे परिसरात चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि भागांचा समावेश असून, या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत प्रामुख्याने या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
कासारवाडी ते नळवाडी, चास ते नळवाडी, कासारवाडी ते चास, कासारवाडी ते सोनेवाडी या चार रस्त्यांना प्रत्येक एक-एक किलोमीटर डांबरीकरणासाठी केंद्र शासनाच्या निधीतून गतवर्षी सुमारे दहा लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचवेळी तात्कालिन खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सदर कामांचे भूमीपूजनही उरकण्यात आले होते. रस्त्यांच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वीच खडीही आणून टाकलेली आहे, मात्र अद्यापही या रस्त्यांवर डांबर पडले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दोन रस्त्यांचे बीबीएम करण्यात आले. परंतु दोन महिन्यांतच त्या रस्त्यांची खडी उघडी पडली आहे. त्यामुळे अपघात होऊन या परिसरातील तीन युवकांना दुखापत झाली होती.
प्रामुख्याने नांदूरशिंगोटे ते चास या आठ किलोमीटर रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर सदर रस्त्याची अद्याप डागडुजी करण्यात आली नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यांची रुंदीसुध्दा कमी प्रमाणात असल्याने वाहने चालविताना अडचण निर्माण होते. तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्यादेखील वेळेवर भरल्या जात नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरुपात तिन्ही रस्त्यांची कामे सुरू केली होती. रात्री-अपरात्री या भागात रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे बनले आहे. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Waiting for tarpaulin: In two months, the passenger's condition due to the open on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.