शिक्षण विभागालाच शिक्षक बदल्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:02 AM2019-06-15T01:02:46+5:302019-06-15T01:04:21+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शासनाने ५१ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करून नाशिक जिल्ह्णात पाठविले, तर जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शासनाने ५१ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करून नाशिक जिल्ह्णात पाठविले, तर जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून आॅनलाइन करण्यात येणार असल्याने मंगळवारपासून शासनाकडून आदेशाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा १७ जूनपासून सुरू होणार असून, तत्पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र आता शासनस्तरावरूनच बदल्यांचे आदेश जारी होत नसल्याने शिक्षकांचीही घालमेल वाढली आहे. खुद्द शिक्षण विभागदेखील बदल्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असून, त्यामुळे पुढची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने ५१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने नाशिकला पाठविले असून, नाशिक जिल्ह्णातून २० शिक्षक रवाना करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांच्या नेमणुका रिक्त जागांवर करण्यात येणार असून, बदल्यांची संपूर्ण प्रकिया पार पडल्यानंतरच ही कार्यवाही होणार आहे.
सैनिक पत्नीची सोलापूरला बदली
सैन्य दलात असलेल्या जवानाच्या शिक्षक पत्नीला तिच्या पतीच्या मूळ गावी आंतरजिल्हा बदली देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार शुक्रवारी नाशिक जिल्हा परिषदेच्या नांदगाव तालुक्यातील मळगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मनीषा निकम यांची सोलापूर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करून त्यांना कार्यालयात बोलावून बदलीचे आदेश दिले.