तीन तासांची प्रतीक्षा; पदरी मात्र निराशा समृद्धीबाधितांना टोलवले : संघटित होण्याचा राज ठाकरेंचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:52 AM2017-11-11T00:52:23+5:302017-11-11T00:53:26+5:30
समृद्धी महामार्गबाधित शेतकºयांना शासकीय विश्रामगृहावर सकाळी ७ वाजेपासूनच बोलावून ठेवले आणि तब्बल तीन तासांनंतर शेतकºयांना ‘राज’दर्शन घडले.
नाशिक : समृद्धी महामार्गबाधित शेतकºयांना शासकीय विश्रामगृहावर सकाळी ७ वाजेपासूनच बोलावून ठेवले आणि तब्बल तीन तासांनंतर शेतकºयांना ‘राज’दर्शन घडले. सर्वत्र ठोकरलेल्या शेतकºयांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून काहीतरी दिलासा देणारे आश्वासन मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी पटापट खुर्च्या सावरल्या आणि आपल्या व्यथा मांडल्या. परंतु, हा प्रश्न जिल्ह्याचा अथवा तालुक्याचा नाही तर तुमच्या गावाचा आहे. त्यामुळे अगोदर संघटित व्हा. संघटित नसल्यानेच सरकार दबावतंत्राचा वापर करत असल्याचे सांगत राज यांनी कुठलेही आश्वासन न देता शेतकºयांना परतावून लावले. मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आणि ती निराशा कुणीही लपवू शकला नाही.
जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांचा सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. सरकारकडून दडपशाहीने पोलिसी बळाचा वापर करत जमिनी ताब्यात घेत असल्याचे गाºहाणे मांडण्यासाठी नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांची समृद्धीबाधित शेतकºयांनी भेट घेतली. पूर्वनियोजित भेट ठरल्याने शेतकºयांना सकाळी ७ वाजेची वेळ देण्यात आली होती. एवढ्या सकाळी राज ठाकरे भेटतील काय, हासुद्धा प्रश्न होताच. तरीही मोठ्या अपेक्षेने ४०-५० शेतकरी ७ वाजेपासूनच गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहावर जमले. परंतु, सकाळचे १० वाजले तरी राज ठाकरे कक्षातून बाहेर येईना. अखेर, तीन तासांची प्रतीक्षा संपली आणि राज यांच्याशी शेतकºयांनी संवाद साधला. संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांच्यासह शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत साºयांची भेट घेऊन झाली, परंतु मार्ग निघत नसल्याचेही सांगण्यात आले. त्यावर राज यांनी शेतकºयांना संघटित होण्याचा सल्ला दिला. सदर प्रश्न केवळ तुमच्या गावापुरता मर्यादित आहे. त्यामुळे उर्वरित शेतकºयांनाही बरोबर घ्या. जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला झुलवतच राहील. राजकीय पक्षांकडे फिरून काही उपयोग होणार नाही असे सांगतानाच, तुमच्या आमदार-खासदारांकडे प्रश्न मांडा, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शेतकºयांनी दिलेली निवेदने घेत राज यांनी काहीही आश्वासन न देता चर्चा आटोपती घेतली.