थम्ब मशीन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 11, 2016 11:50 PM2016-03-11T23:50:58+5:302016-03-12T00:03:43+5:30
मनपा सिडको : लेटलतिफांना बसणार चाप
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात गेल्या महिनाभरापासून थम्ब मशीन बसविण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने त्याचा फायदा मात्र उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत आहे.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. अधिकारी, कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अधिकारीवर्गानेदेखील याकडे कानाडोळा केला आहे. सडको कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची तसेच कामावरून घरी जाण्याची वेळच नाही. विशेष म्हणजे उशिराने कामावर हजर होण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील हजेरी नोंदवही केव्हाही कामावर रुजू झाल्यानंतर मिळत असल्याने आजवर कोणीही कामावर वेळेवर येण्याची तसदी घेतलेली नाही. अर्थात उशिराने जरी कामावर हजर झाले तरी कधीही लेटमार्क लागत नाही.
कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेवर हजर राहून नागरिकांची वेळेवर कामे मार्गी लागावी यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने मनपाच्या सर्व विभागात थम्ब मशीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. सिडको कार्यालयातही हे मशीन गेल्या महिनाभरापासून बसविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने लेटलतिफ व कामचुकार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होत आहे.
मनपाने थम्ब मशीन हे त्वरित कार्यान्वितकेल्यास कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहण्याची सवय लागेल व सर्वसामान्य नागरिकांची कामेदेखील वेळेवर होण्यास मदत होऊ शकते. (वार्ताहर)