अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:22 AM2019-02-25T00:22:24+5:302019-02-25T00:22:49+5:30
शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक : शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागातील अर्धवेळ ग्रंथपालांना मात्र सातव्या वेतन आयोगाच्या लाभाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी अर्धवेळ ग्रंथपाल सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित राहिलेला आहे.
शासनाकडून प्रत्येकवेळी वेतन आयोगात अर्धवेळ ग्रंथपालांना विलंबाने लाभ लागू करण्यात आला असून, यावेळी पूर्णवेळ ग्रंथपालांसोबतच लाभ मिळेल, अशी अपेक्षा अर्धवेळ ग्रंथपालांना होती. पूर्णवेळ ग्रंथपालांसोबतच अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन आयोगाचा लाभ मिळावा, अशी मागणी ग्रंथालय शिक्षक परिषदेने शासनाकडे केलेली आहे. मुळात शासनाच्या अधिसूचनेतच पूर्णवेळ कर्मचारी या शब्दप्रयोगासोबतच अर्धवेळ शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनाही वेतन आयोगाचा लाभ लागू असेल असे नमूद असते तर अर्धवेळ ग्रंथपालांना न्याय मिळू शकला असता. परंतु, तसा उल्लेख नसल्याने शासनाला अर्धवेळ ग्रंथपालांसाठी स्वतंत्र अध्यादेश काढावा लागत असल्याने या प्रक्रियेला एप्रिलनंतरही तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळीही अर्धवेळ ग्रंथपालांच्या वाटेला प्रतीक्षा, विलंब आणि निराशाच असल्याची महाराष्ट्र ग्रंथालय शिक्षक परिषदेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
सेवाशर्तीचा लाभ मिळावा
शंभर टक्के अनुदानित शाळेतील पद असूनही केवळ अर्धवेळ पद म्हणून कायमच ग्रंथपालांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी केला आहे. अर्धवेळ ग्रंथपालांना सेवाशर्तीचा लाभ दिला जात नसल्यामुळे त्यांना कालबद्ध वेतनश्रेणी, घरभाडे भत्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ, भविष्य निर्वाह निधी योजना, सेवानिवृत्ती वेतन, असे कोणतेही लाभ मिळत नाही. महागाई भत्त्याशिवाय कोणताही लाभ मिळत नाही ही अर्धवेळ ग्रंथपालांच्या बाबतीत मोठी शोकांतिका असून, अर्धवेळ ग्रंथपालांना सेवाशर्तीचा लाभ त्वरित लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वेतन आयोगाच्या दुसऱ्या खंडाची प्रतीक्षा
बक्षी समितीने शासनास आत्तापर्यंत वेतन आयोगाचा पहिला खंड सादर केलेला आहे. दुसºया खंडात यापूर्वीच्या वेतन आयोगात राहिलेल्या त्रुटींची दुरुस्ती होणार असल्यामुळे सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतनाची ग्रंथपालांसह इतर पदांवरील शिक्षक व कर्मचारी दुसºया खंडाची आतुरतेने वाट पाहत आहे. ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीवर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला असून, ग्रंथपाल पदाचे वेतनाचे अवमूल्यन करण्यात आलेले आहे. यासंदर्भात बक्षी समितीसमोर ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार, विनोद भंगाळे, जितेंद्र पाठक, जगदीश चित्ते, पंडित वाघमारे यांनी सुनावणीस उपस्थित राहून अर्धवेळ ग्रंथपालांची बाजू मांडली आहे.