कोरड्या पडलेल्या कादवा नदीला पाण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:02 PM2021-05-13T22:02:07+5:302021-05-14T00:56:24+5:30
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावांमधून होत आहे.

एक महिन्यापूर्वी कादवा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले व नंतर आठ दिवसातच कादवा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच काही ठिकाणी कादवा नदी पात्रालगत गावाला पाणीपुरवठा करणारी पाणी योजना आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी कमी पडले आहे. त्याचप्रमाणे सध्या कादवा नदी परिसरामधील गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार वारंवार हात -पाय धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होत आहे. म्हणूनच कादवा नदीपात्रात मागणी सोडण्याची आवश्यकता आहे.
विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून करंजवण, ओझे, म्हैळूस्के, लखमापूर परिसरामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अंत्यसंस्कारासह दशक्रियाला पिंडदानासाठीही पाणी शिल्लक नाही.
उशाला धरण, पायथ्याला नदी... तरीही गावे पाण्यावाचून उपाशी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथील आमदार व विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोरड्या पडलेल्या कादवा नदीपात्रात पाणी सोडून तालुक्यातील गावांना न्याय द्यावा, अशी मागणी कादवा परिसरातून होत आहे.