तळवाडेला पाण्याच्या टॅँकरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 05:03 PM2019-05-17T17:03:43+5:302019-05-17T17:04:10+5:30
प्रस्ताव सादर : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ संतप्त
सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे गावात पाणीटंचाई तीव्र बनली असून एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरु करावा यासाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करून पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने गावातील महिलांनी अखेर निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच लता सांगळे यांनी दिली आहे.
तळवाडे ग्रामपंचायतीने ४ मे रोजी टँकर सुरु करावा यासाठी निफाड पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर गावातील बोअरवेल ,विहीर अधिग्रहण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. परंतु, केवळ पाच दिवस पाणी पुरेल असे पत्र ग्रामपंचायतीने सादर केले. ९ मे पर्यंत गावातील विहिरीचे पाणी पुरले,त्यानंतर एक बोअरवेल घेतले परंतु पाण्याचा थेंबही लागला नाही. सात दिवस होऊनही गावात पाणी मिळत नाही, एक थेंब पाणी मिळत नसल्याने शिवारात अनेक कोस महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात तात्काळ टँकर सुरु झाला नाही तर गावातील महिलांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता न्यायालय, मंत्रिमंडळाने अनेक अटी शिथिल करून नागरिकांना पाणी आणि जनावरांसाठी छावणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा प्रशासन देखील टँकरचे प्रस्ताव त्वरित मान्य करून नागरिकांना पिण्याचे पाणी तात्काळ मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात प्रस्तावास मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत आहे. एकीकडे दुष्काळाशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असतांना निफाड तालुका मात्र टॅँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे सरपंच लता सांगळे यांनी म्हटले आहे.
गावात पाण्याचा थेंब नाही
गावात पाणी टँकर सुरु करावा , असा प्रस्ताव पंचायत समितीत सादर केला परंतु, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवस झाले. गावात पाण्याचा थेंब नाही. सरकार एकीकडे मागेल त्याला टँकर देण्याची घोषणा करते, आचार संहिता शिथिल करते पण तालुका प्रशासन पाण्याचा टँकर सुरु करत नाही. ही खेदजनक बाब आहे.
- लता सांगळे, सरपंच, तळवाडे