वाजेच्या साथीदारांचा शोध लागेना; क्राईम सीनला ‘मुहूर्त’ मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:30 AM2022-02-09T01:30:14+5:302022-02-09T01:30:37+5:30
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनात मुख्य संशयित म्हणून त्यांचा पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे; मात्र त्याच्यासोबत असलेल्या पाच संशयित साथीदारांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. वाजेच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि. १०) संपणार आहे. तसेच वाजे खुनाची घटना जशीच्या तशी उभी करण्याकरिता ‘क्राईम सीन’लादेखील अद्याप ग्रामीण पोलिसांना ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनात मुख्य संशयित म्हणून त्यांचा पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे; मात्र त्याच्यासोबत असलेल्या पाच संशयित साथीदारांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. वाजेच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि. १०) संपणार आहे. तसेच वाजे खुनाची घटना जशीच्या तशी उभी करण्याकरिता ‘क्राईम सीन’लादेखील अद्याप ग्रामीण पोलिसांना ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या १३ दिवसांपूर्वी डॉ. सुवर्णा वाजे यांची मोटार जळीत अवस्थेत शहराबाहेर रात्रीच्या सुमारास पोलिसांना आढळून आली होती. या मोटारीत मिळालेल्या हाडांमुळे पोलिसांनी तपासाला गती दिली. हाडांचा डीएनए वाजेंच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत जुळल्यामुळे वाजे खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला. वाजे मर्डर मिस्ट्री हळू हळू उलगडू लागली. वाजेंच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या जाब-जबाबावरून पोलिसांनी संशयित संदीप वाजे यास अटक केली. वाजे याने पराकोटीला पोहोचलेल्या कौटुंबिक कलहामधून पत्नी सुवर्णाचा काटा काढल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. संशयित वाजे याने थंड डोक्याने पूर्वनियोजित कट रचून पाच ते सहा साथीदारांच्या मदतीने डॉ. सुवर्णा यांचा खून केला व त्यानंतर मृतदेह मोटारीसह पेटवून देऊन पुरावा नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून न्यायालयात याबाबत नेमके काय पुरावे सादर केले जातात आणि वाजेची पोलीस कोठडी गुरुवारी (दि. १०) संपल्यानंतर सरकारपक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात काय युक्तिवाद केला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.
वाडीवऱ्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे; मात्र अद्यापही तपासाला पुढे नेणारी ठोस माहिती पोलिसांच्या हाती येत नसल्याने संशयित संदीप वाजेसोबत खून प्रकरणात सहभागी असलेल्या एकाही साथीदाराला ग्रामीण पोलिसांकडून मंगळवारी रात्रीपर्यंत तरी अटक करण्यात आली नव्हती. अन्य साथीदारांना शाेधासाठी चौकशीकरिता काही संशयितांची पोलीस धरपकड करत आहेत. पोलीस कोठडीत वाजेकडून पोलिसांना फारसे सहकार्य मिळत नसल्याचेही बोलले जात आहे.
--इन्फो--
तांत्रिक विश्लेषण हाच तपासाचा आधार
मोबाईल फोनचे सीडीआर, लोकेशन, डेटा पडताळणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आदींबाबत ग्रामीण पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. तांत्रिक विश्लेषणाच्याआधारे पोलिसांकडून वाजेच्या अन्य संशयित साथीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र अद्याप त्यास यश आलेले नाही. वाजे याने मोबाईलमधील बहुतांश डेटा डिलिट केल्यामुळे पोलिसांपुढे अडचण निर्माण होत आहे.