अवयवदान जनजागृतीसाठी शहरातुन पदयात्रा मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:28 PM2020-01-05T14:28:37+5:302020-01-05T14:33:18+5:30
पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे
नाशिक : अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅन्ड बॉडी डोनेशन, मुंबई व मृत्यूजंय आॅर्गन फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ५) कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून अवयवदान जनजागृती पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे.
ही पदयात्रा नाशिक, शिर्डी, अहमदनगर, पुणे, वाई, सातारा, सांगली, कोल्हापुर, गारगोटी ते बेळगाव असा प्रवास करणार आहे. या मार्गात येणाऱ्या अनेक गावात मुक्कामाच्या दिवशी तेथील मंदिर, शाळा आदी ठिकाणी जाऊन गावातील नागरिकांसाठी अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी त्यांना अभिवादन करुन पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी पदयात्रेतील व्यक्तिंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थिती लावली होती. या पदयात्रेत मृत्यूंजय आर्गन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल देशपांडे, शैलेश देशपांडे, नारायण म्हसकर आदी सहभागी आहे.