लोकवस्तीतून जेरबंद बिबट्यां करण्यासाठी वेशीवर ‘तटबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:39 AM2019-02-26T01:39:56+5:302019-02-26T01:40:15+5:30
जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे.
नाशिक : जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. शहराच्या वेशीवरून वाहणाऱ्या डाव्या कालव्यालगतच्या मळे परिसरापासून तर थेट देवळाली कॅम्प-भगूर परिसरांपर्यंत बिबट्याचा संचार आढळून येत आहे. त्यामुळे लोकवस्तीतून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शहराच्या वेशीवर वनविभागाकडून पिंजरे लावून जणू ‘तटबंदी’ केली आहे.
दि. २५ जानेवारी व दि. १७ फेब्रुवारी रोजी शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या सावरकरनगर या सीमेंटच्या जंगलात दोन प्रौढ नर बिबट्यांनी शिरकाव केला होता. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे दोन व एक असे तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. तसेच शनिवारी (दि.२३) भगूर गावालगत रेणुकादेवी मंदिराजवळ लोकवस्तीत लावलेल्या पिंजºयात एक वर्षाचा बछडा पिंजºयात जेरबंद करण्यात आला. अद्यापही शहराच्या वेशीवर बिबट्यांचा संचार वनविभागाला आढळून येत आहे. पिंजरे लावायचे तर कोठे-कोठे? अन् किती?, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
शहरालगत बिबट्याचा वाढता संचार हा धोक्याचा जरी मानला जात असला तरी बिबट्या शहराच्या वेशीवर किंवा लोकवस्तीत का शिरकाव करीत आहेत? या प्रश्नाचे उत्तर नागरिकांनी शोधणे गरजेचे आहे.
नैसर्गिक अधिवासात माणसाकडून होणारे अतिक्रमणामुळे बिबट्याचे लोकवस्तीत अतिक्रमण होऊ लागले आहे. नैसर्गिक अधिवासामधील जगण्याचे संसाधनेही कमी झाल्याने बिबट्याने परिघ ओलांडल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.