संरक्षक दगडी भिंत कोसळून माय-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:35 AM2019-01-08T01:35:28+5:302019-01-08T01:35:51+5:30
उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़
नाशिक : उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़ सत्यभामा रमेश सरकटे (४५) व प्रकाश रमेश सरकटे (१८, नयनतारा इस्टेटच्या मागे, संभाजी चौक ) असे मृत्यू झालेल्या माय-लेकांची नावे आहेत़ या दुर्घटनेस सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका असे दोघेही जबाबदार असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटे यांनी केली आहे़ दरम्यान, या घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
दुसरीकडे जाण्यापूर्वीच घडली घटना
सरकटे दाम्पत्य आपल्या मुलांसह दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणार होते़ त्यांनी दुसरीकडे घर बघून त्यासाठी द्यावयाची अनामत रक्कमही ठरविली होती़ येत्या एक-दोन दिवसांत घरातील सामान दुसरीकडे घेऊन जायचे असल्याने त्यांनी किराणाही भरून ठेवला होता़ मात्र, तत्पूर्वीच झालेल्या या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाला़
संरक्षक भिंतीलगतच अनेक खड्डे
गत काही दिवसांपासून बांधकाम विभागाने या दगडी संरक्षक भिंतीलगत खड्डे खोदले असून, त्यामध्ये ट्रॅक्टरने मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना भिंत ढासळून दुर्घटना घडली.
४ याठिकाणी भिंतीलगतच अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे भुसभुशीत झालेल्या जमिनीवर ट्रॅक्टरचा दबाव आल्याने भिंत कोसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सार्वजनिक बांधकामचे अधिकारी-कर्मचारी गायब
संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर आपल्यावर कोणतीही जबाबदारी वा जाब विचारू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी धावण्याऐवजी गायब झाले होते़ विशेष म्हणजे या ठिकाणी खोदण्यात आलेले मोठमोठे खड्डे व त्यावर टाकला जात असणारा मुरूम नजरेत येऊ नये यासाठी एक प्रवेशद्वार लाकडे टाकून बंद करण्यात आले तर दुसºया प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक हे कोणालाही मध्ये जाऊ देत नसल्याचे चित्र होते़