घराची भिंत पडून दोघे जखमी
By admin | Published: August 5, 2016 01:00 AM2016-08-05T01:00:37+5:302016-08-05T01:01:10+5:30
घराची भिंत पडून दोघे जखमी
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे घराची भिंत अंगावर पडून दोन जण गंभीर जखमी झाले, तर जोगलटेंभी येथे गोदा-दारणेच्या पूरपाण्यामुळे गाय व वासराचा मृत्यू झाला.
नायगाव व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मंगेश मुरलीधर गिते यांच्या घरावर शेजारील भिंत पडून सविता मंगेश गिते (२५), विद्या बाळासाहेब दराडे (१२) या दोघी गंभीर जखमी झाल्या, तर जिजाबाई मुरलीधर गिते या किरकोळ जखमी झाल्या आहेत. माजी उपसरपंच कैलास गिते व संजय लहाने यांनी जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गिते कुटुंब घरात असताना संततधार पावसाने ही भिंत गिते यांच्या घरावर पडल्याने घरांच्या पत्र्यांसह घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी तलाठी राहुल देशमुख, सरपंच नलिनी गिते, उपसरपंच सुरेश गिते, पोलीसपाटील भिकाजी गिते यांनी पंचनामा करून गिते कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली.
जोगलटेंभी येथे मंगळवारी आलेल्या गोदा-दारणेच्या पुरात अडकून पडलेल्या ज्ञानेश्वर केशव कमोद यांच्या गाय व वासराचा मृत्यू झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी जायगाव येथील अनिल बाबूराव पवार यांची चार पाळीव डुकरे लेंडी नाल्याच्या पुरात वाहून गेली आहेत. (वार्ताहर)