वानरजोड्यांची शहरभर भटकंती; बाळगोपाळांना कुतुहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:58 PM2019-09-16T16:58:01+5:302019-09-16T16:59:08+5:30
वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले.
नाशिक : मानवाचे पुर्वज मानले जाणारे चार वानर मागील काही दिवसांपासून जणू नाशिक दर्शनासाठी भटकंती करत या भागातून त्या भागात हजेरी लावत आहेत. वानरांचे कुतुहल जसे लहानग्यांना तसे मोठ्यांनाही असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण त्यांच्या मर्कटलिला मोबाइलने टिपण्याचा प्रयत्नही करत आहेत. दोन दिवसांपुर्वी काळ्या तोंडाच्या भल्या मोठ्या वानरांच्या दोन जोड्या पंचवटीत मुक्कामी होत्या. रविवारी सकाळी या वानर जोड्यांनी पुन्हा जंगलाची वाट धरल्याची खात्री वनविभागाने केली आहे.
वानर हे वन्यजीव साधारणत: गड-किल्ल्यांसह लेणी, अभयारण्याच्या परिसरात नजरेस पडतात. वाट चुकून अनेकदा वानर शहरी भागातदेखील अन्न-पाण्याच्या शोधात दाखल होतात. वरूणराजा जिल्ह्यात समाधानकारक बरसल्यामुळे सर्वत्र गर्द हिरवाई पहावयास मिळत आहे. नदी, नाले, आहोळ दुथडी भरून वाहत असताना अचानकपणे चार वानरांनी शहरात दर्शन दिल्याने नाशिककर अवाक् झाले आहे. वानरांची एक जोडी दोन महिन्यांपुर्वी गोरेवाडी नाशिकरोड, जेलरोड या भागात नजरेस पडली होती. त्यानंतर या जोडीने सातपूरजवळील ‘नाशिक देवराई’ला आठवडाभरापुर्वी भेट दिली. देवराईमध्ये मनसोक्त दोन्ही वानर डोंगराच्या पायथ्याशी वृक्षराजीच्या सानिध्यात बागडले. त्यानंतर दोन दिवसांनी तीन वानर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांना बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होेती. शनिवारी (दि.१४) वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. यावेळी काहींन त्यांच्या हातात टमाटे, काकडी, पेरू यांसारखी फळे भिरकावली तर काहींनी शेंगदाणे, फुटाण्याच्या पुड्याही फेकल्या.