भटक्या कुत्र्यांची दहशत
By admin | Published: June 20, 2017 12:46 AM2017-06-20T00:46:57+5:302017-06-20T00:47:53+5:30
नागरिकांमध्ये घबराट : येवल्यात अनेकांना चावा
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून, सोमवारी कुत्र्यांच्या हल्लयात अनेकजण जखमी झाले असून जखमींवर सरकारीसह खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, जखमींनी येवला ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यात जाऊन रेबीज लस घेतली. परंतु याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी करूनही याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येवला शहरात गेल्या पाच दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, ठिकठिकाणी या कुत्र्याने चावा घेऊन अनेकांना जखमी केले आहे. अचानक चावा घेणारे हे दोन कुत्रे पिसाळलेले असल्याची माहिती आहे. काळ्या व पांढऱ्या रंगाचे हे दोन पिसाळलेले कुत्रे रस्त्यावर व शहर परिसरात भटकत आहेत व जोरदार चावा घेत असल्याचे बघ्यांनी सांगितले.
शहरातील बुंदेलपुरा, कहार गल्ली भागामध्ये गेल्या चार-पाच दिवसांमध्ये तानिया शेख (११), इसान सय्यद अली (३), मोमीन महंमद शिफक (५५), मोमीन अन्सारी (५१), अमन अन्सारी (३), हयान शेख (९), इसान सादिक सय्यद (५), सोहम सोनवणे (७) यांच्यासह अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून, भटक्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढूनही प्रशासन ढिम्मच आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करण्याची मागणी होत आहे. येवला शहरासह अंदरसूल रोड, नांदगाव रोड व बसस्थानक परिसरासह विविध भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.