गुदामांच्या शोधासाठी नाशिक जिल्ह्यातील तहसिलदारांवर भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:18 PM2017-11-22T13:18:47+5:302017-11-22T13:21:32+5:30
खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते.
नाशिक : जिल्ह्यात दहा केंद्रावर आधारभुत किंमतीत मका खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केट फेडरेशनने तयारी पुर्ण केली असली तरी, दहापैकी एकाही तालुक्यात खरेदी केलेला मका साठवणूक करण्यासाठी तहसिलदारांकडून गुदाम मिळत नसल्याने शासन आदेशानंतरही जिल्ह्यात मका खरेदी सुरू होऊ शकली नाही, दुसरीकडे शासकीय गुदामे धान्याने हाऊस फुल्ल असल्यामुळे खासगी गुदामांच्या शोधासाठी तहसिलदारांना भटकंती करावी लागत आहे.
खुल्या बाजारात मक्याचे भाव अकराशे ते बाराशे रूपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शासनाने यंदाही आधारभुत किंमतीत १४२५ रूपये दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या जिल्ह्यात मक्याचे उत्पादन घेतले जाते त्याठिकाणी जिल्हा मार्केट फेडरेशनच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. कोणत्या तालुक्यात मका खरेदी केंद्रे सुरू करायचे याबाबतचे अधिकार जिल्हा पुरवठा अधिका-यांना देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यात मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, दिंडोरी, निफाड या दहा तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. तसे पत्र मार्केट फेडरेशनला देण्यात आले, मात्र मका खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणा-या मक्याची साठवण करण्यासाठी गुदाम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुक्यातील तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, खरीपात घेण्यात आलेला मका काढण्यास शेतक-यांनी सुरूवात केली असून, सध्या खळ्यावर पडून असलेला हा मका कडक उन्हामुळे सुकून त्याचे वजन कमी होऊ लागले आहे तर अधून मधून अवकाळी पाऊसही हजेरी लावत असल्याने तो खराब होण्याची भितीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतक-यांकडून आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र खरेदी केलेला मका साठवण्याची मोठा प्रश्न फेडरेशन व तहसिलदारांपुढे उभा ठाकला आहे. पुरवठा खात्याने मक्यासाठी खासगी गुदामे भाड्याने घेण्याची तयारीही दर्शविली आहे, परंतु जिल्ह्यात गुदामे मिळत नसल्याचे तहसिलदारांचे म्हणणे आहे. एकीकडे फेडरेशन व दुसरीकडे शेतक-यांचा दबावामुळे तहसिलदारांना महत्वाचे कामे सोडून गुदामे शोधण्यासाठी गावोगावी भटकावे लागत आहे. काही ठिकाणी गुदामे असली तरी, त्यांची अवस्था अतिशय बिकट असून, त्याची डागडुजी करण्यातच वेळ व पैसा खर्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदवड व येवला या दोन तालुक्यात गुदामे मिळाल्याने येत्या दोन दिवसात केंद्रे सुरू करण्यात येणार आहे.