न्यायडोंगरीत पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:39 AM2018-07-29T00:39:17+5:302018-07-29T00:39:33+5:30
पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.
न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सलाईनवर जगत असलेल्या पिकांनी मात्र माना टाकायला सुरु वात केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांच्या भटकंतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जनावरे जगविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याची दाहकता निर्माण झाल्याने भविष्यात पाणी मिळेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात पावसाने उघडीप दिल्याचेच दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वषाह्ण्रपासून न्यायडोंगरी परिसरात पावसाने पाठ फिरवलेली आहे. यावर्षी पावसाळा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला; परंतु केवळ शिडकाव्याशिवाय मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले, बंधारे, विहिरी अजूनही कोरडेठाक असून, तहानलेले आहेत. उर्वरित दिवसांत पाऊस पडेल की नाही याची शास्वती दिसत नसल्याने ग्रामस्थ चिंतित आहे.
मुसळधार पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेले कपाशी, भुईमूग, मका आदी पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर करपताना पाहावे लागत आहे. तर फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जिवाचे रान करावे लागत आहे. टँकरद्वारे पाणी विकत आणून फळबागांना पाणी द्यावे लागत असून, रोज हजारो रु पये खर्च होत आहेत. परिसरातील अनेक कुटुंबांची गुजराण शेतमजुरीवर अवलंबून असून, पाऊसपाणी नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतमजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने पाण्याची दाहकता लक्षात घेता या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कूपनलिकेची पातळीही खालावली
दोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मिळेल त्या ठिकाणी जाऊन पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील कुपनलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरीदेखील तळ गाठल्याने टँकरने पाणीपुरवठा करणेदेखील अवघड झाले आहे. पैसे खर्च करूनही पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ पाहत असताना ग्रामपालिकेने पाण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण फायदा झाला नाही, अशी खंत सरपंच गायत्री मोरे यांनी व्यक्त केली.