पाण्यासाठी जनावरांची भटकंती
By admin | Published: May 11, 2016 10:56 PM2016-05-11T22:56:34+5:302016-05-12T00:41:23+5:30
पाण्यासाठी जनावरांची भटकंती
लक्ष्मण सोनवणे ल्ल बेलगाव कुऱ्हे
इगतपुरी तालुक्यात दुष्काळाची कोरडी छाया नागरिकांची तडफड वाढवत आहे. दुष्काळी परिस्थितीने आता भयंकर पाय पसरले आहेत. पाण्याचा ठणठणात जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आल्याने दुष्काळ आता त्यांचा वैरी होऊन बसला आहे.
तालुक्यातील १२६ महसुली गावांत एकूण पशुधनाची संख्या जास्त आहे. गायी ४४ हजार २९० आहेत, तर म्हैस- २२ हजार ९११, शेळ्या० १९ हजार ४२७, मेंढ्या- ४०, घोडे- ४९, कोंबड्या- ३९ हजार ५७३ आहेत. त्यात शेळ्या, मेंढ्या, म्हैस आदि जनावरे पशुपालकांनी पाळलेली आहेत. त्यांच्यासाठी चारा व पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याचे भयाण चित्र दिसत आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांवरदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे. तालुक्यात चाराटंचाईमुळे शेतकरी दुचाकीवरून मिळेल त्या ठिकाणावरून चारा विकत आणत आहेत. काही शेतकरी १६०० रुपये ट्रॅक्टरप्रमाणे गवत विकत घेतात, तर पैशाअभावी तेही मोजक्या शेतकऱ्यांना गवत घेता येते.
प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत असल्याने उष्णता वाढत आहे. तालुक्यातील तपमान ४० अंश किंवा त्याहून अधिकच आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्ष चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अजूनही झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर केवळ आता वरवरचे उपाय करून भागणार नाही, तर कायमस्वरूपी एखाद्या योजनेची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल. असे उपाय केल्याशिवाय दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही.