वणी : रानमेव्याची चव चाखण्यासाठी ग्राहकांची झुंबड कोकणातील टपोरी जांभळे बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:43 AM2018-05-27T00:43:57+5:302018-05-27T00:43:57+5:30
वणी : आंबा या फळांच्या राजाच्या उत्पादनामुळे परिचित कोकणातील दर्जेदार व टपोरी जांभळे बाजारात आली.
वणी : आंबा या फळांच्या राजाच्या उत्पादनामुळे परिचित कोकणातील दर्जेदार व टपोरी जांभळे बाजारात आली असून, संकरित पद्धतीच्या उत्पादित जांभळाच्या तुलनेत दिंडोरी तालुक्यातील काही भागातील जांभळेही विक्रीस दिसू लागली आहेत. जंगली पद्धतीने उत्पादित जांभळास व्यावसायिक दृष्टिकोन नसला तरी जंगली जांभळाची गोडी मधुर अशीच आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील जांभळांनी शहरी भागातील बाजारात प्रवेश केला आहे. या भागातील संकरित पद्धतीने उत्पादित जांभळे सहसा क धन बिजारण गटाची असतात. कोकण कृषी विद्यापीठाने या वाणाचा शोध लावल्याची माहिती आहे. जून, जुलै हा लागवड कालावधी असतो.
या भागात जांभळाचे प्रमुख उत्पादन हा व्यवसाय मानला गेल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते त्या तुलनेत दिंडोरी तालुक्यात बोटावर मोजण्याइतके उत्पादन घेण्यात येते. बी लावणे किंवा ग्राफ्टिंग पद्धतीने लागवड करण्यात येते. बियांपासून गादी पाण्यावर रोपे तयार करून तसेच पॅच पद्धतीने डोळे भरून ग्राफ्टिंग पद्धतीनेही उत्पादन घेण्यात येते.
एका हेक्टरमध्ये अंदाजे १०० झाडांची संख्या बसेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या अंतरावर लागवड करण्यात येते. जांभूळ बियांमध्ये एकापेक्षा अधिक बियांकुर असतात. कुजलेले शेणखत, सुपरफॉस, कोमल माती याची गरज लागवडीसाठी आवश्यक. लागवडीनंतर झाडाची वाढ ८ ते १० वर्षांनी होते तेव्हापासून उत्पादन घेण्यात येते.