बाजारपेठेत प्रवेश हवा; मग मोजा पाच रुपये...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:18+5:302021-03-30T04:11:18+5:30
शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहेत. मात्र, नागरिकांकडून ...
शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहेत. मात्र, नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन होतच असल्याने पोलीस व मनपा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन् प्रवेश शुल्काची मात्रा शोधून काढली आहे.
शहरात शिवाजीरोड, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा ते सरस्वती चौकापर्यंत (बादशाही कॉर्नर) खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी उसळते. दिवसभर या भागात खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून येते. यामुळे या बाजारपेठेकडे येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी सोमवारी बॅरिकेट टाकून बंद केले. बाजारपेठेत प्रवेश करण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणांहूनच नागरिकांना बाजारात प्रती व्यक्तीप्रमाणे पाच रुपयांचे शुल्क आकारुन सोडले जाणार आहे.
---इन्फो---
...तर ५०० रुपयांचा दंड
बाजारात पोलिसांची गस्त राहणार असून, अनावश्यकरित्या तासाभरापेक्षा जास्त वेळ कोणी रेंगाळत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींची पोलिसांकडून अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. प्रवेश करताना प्रवेश शुल्क पावतीवर मनपा कर्मचाऱ्यांकडून प्रवेशाची वेळ ठळकपणे नमूद केली जाणार आहे.
---इन्फो--
...येथून मिळणार मेनरोडवर प्रवेश
१. नवापुरा कॉर्नर
२. सेंट थाॅमस चर्च
३. बादशाही कॉर्नर (सरस्वती लेन)
४. धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक)
--इन्फो--
बारा तास असणार पोलीस तैनात
मेनरोड परिसरातील जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील एन्ट्री पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. निश्चित केलेल्या एन्ट्री पॉइंटमधूनच नागरिकांना बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. पोलिसांची पायी गस्त बाजारपेठेत राहणार असून, विना पावती चोरट्या रस्त्याने बाजारपेठेत आलेल्या संशयितांची अचानकपणे पोलीस तपासणी करणार आहेत.
---इन्फो--
राज्य पोलीस कायद्यानुसार अंमलबजावणी
राज्य पोलीस कायदा १९५१च्या कलम-४३ (२), (३) अन्वये पोलीस आयुक्तांना गर्दी व जमाव जमण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सुव्यवस्था करण्याठी वाजवी शुल्क वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार पोलीस आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेला सोबत घेत तजवीज करु शकतात. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या कायद्यानुसार शहरातील गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये नियोजन करत पाच रुपये शुल्कासह प्रवेश तसेच एक तासाची वेळमर्यादा घालून दिली आहे.
--इन्फो--
या ठिकाणीही असणार हाच नियम
सिटी सेंटर मॉल (प्रवेश शुल्क - ५ रु. वेळ : एक तास)
पंचवटी येथील बाजार समिती
पवननगर भाजी मार्केट, सिडको
अशोकनगर भाजी मार्केट, सातपूर
कलानगर भाजी मार्केट, इंदिरानगर
---इन्फो---
विक्रेते, कर्मचाऱ्यांना पास
बाजारपेठांमधील विक्रेते व त्यांच्याकडील कामगारांना प्रवेशासाठी भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या वतीने विहीत नमुन्यातील पास दिले जाणार आहेत. हे पास दाखवून त्यांना बाजारपेठेत आपल्या व्यवसायासाठी जाता येणार आहे. तसेच या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पत्त्याचा पुरावा दाखवून (आधारकार्ड) विनाशुल्क प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बाजारात हातगाडीवर किरकोळ वस्तुंची विक्री करणाऱ्यांनाही विक्रेते समजून त्यांनाही पोलिसांकडून पास दिले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.