शास्त्रीय संगीताचा गोडवा जगासमोर मांडायचाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:36+5:302021-03-14T04:14:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या गायनाशी माझा पहिल्यांदा संबंध आला, तो मी बासरी वादनाचे धडे ...

Want to present the sweetness of classical music to the world! | शास्त्रीय संगीताचा गोडवा जगासमोर मांडायचाय !

शास्त्रीय संगीताचा गोडवा जगासमोर मांडायचाय !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या गायनाशी माझा पहिल्यांदा संबंध आला, तो मी बासरी वादनाचे धडे घ्यायला सुरवात केल्यानंतर. पहिल्यांदा पंडितजींचे गायन हे एका ध्वनिफितीमध्ये ऐकले होते. बिहाग ह्या रागमधले त्यांचे ध्वनिमुद्रित सादरीकरण हे शास्त्रीय संगीतात नुकताच प्रवेश केलेल्या मला समजणे शक्यच नव्हते. मात्र, त्या सादरीकरणाने मला मंत्रमुग्ध करून सोडले होते. भारतातील शास्त्रीय संगीत आणि बासरीसारख्या वाद्यातील गोडवा समजण्यासाठी भाषेचे किंवा सूरांचे कोणतेही बंधन आड येत नाही. भाषेचा हाच गोडवा मला जगासमोर मांडायचा असल्याचे आंतरराष्ट्रीय बासरीवादक आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे अमेरिकन शिष्य नॅश नॉबर यांनी सांगितले.

नॅश हे मूळचे अमेरिकन असून, त्यांनी भारतात अनेक वर्ष पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरी वादनाचे शात्रोक्त शिक्षण घेतले आहे. सध्या ते मुंबई येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असून, भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभरात करण्यासाठी कार्यरत आहेत. शास्त्रीय संगीताचा विदेशी अभ्यासक या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे विचारदेखील मांडले. भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत या दोघांच्या मूळ सिद्धांतांमध्ये जमीन-आस्मानचा फरक आहे. पाश्चात्य संगीत हार्मोनी आणि तीव्र व कोमल सप्तक यावर आधारित आहे, तर भारतीय संगीत हे स्वरबद्ध रचनांवर (मेलडी) आधारित असून, असंख्य सप्तकांचा (इन्फिनिट स्कॅल्स) त्यात समावेश आहे. तत्वतः ते जरी वेगळे भासले तरी देखील शास्त्रशुद्ध कला प्रकार हे देश, भाषा आणि परंपरा या बंधनापलीकडे असतात,असे नॅश यांनी सांगितले.

माझे गुरु पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या ऊर्जेमुळे माझ्या आतील संगीताची ज्योत तेवत राहिली. गुरु मोठमोठे कार्यक्रम संपवून यायचे आणि सकाळी लवकर आमच्याबरोबर वंदनाला बसायचे. त्यांच्या सानिध्यात त्या बासरीच्या रागाच्या भावनेची ऊर्जा जणू गुरूंकडून आमच्यात सामावते आहे असे वाटायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यांचा मते, व्यावसायिक कलाकारांची संख्या वाढली तरच शास्त्रीय संगीताला समाजात एक अढळ स्थान प्राप्त होईल, असेही नॅश यांनी नमूद केले. भारतीय शास्त्रीय संगीत हे परिपूर्ण असून, तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यात समकालीन बदल करण्याची गरज नाही. शास्त्रीय संगीत कालातीत असून त्याचे मूळ आकर्षक स्वरूप लोकांपर्यंत पोचले की लोक आपोआप त्याच दिशेने वळायला सुरवात होईल, असेही त्यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतात काही प्रयोग करायचे झाले तरी त्याची मूलभूत तत्व ही पाळायलाच हवी. जसे की पाश्चात्य संगीताच्या पद्धतीने स्वरांचे चढ-उतार करता येतात परंतु एखाद्या रागाची ओळख पटवून देणारी रचना ही जशीच्या तशीच वादनात उमटायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

--------------------------

दोन्ही मुलाखतींसाठीचा कॉमन लीड

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त रित्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् या संस्थेने ‘स्वरभास्कर १००’ हा कार्यक्रम १४ मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता कालिदास कलामंदिर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी आणि आंतरराष्ट्रीय बासरीवादक नॅश नॉबर हे नाशिकला आले आहेत. ‘लोकमत’ ने घेतलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या.

Web Title: Want to present the sweetness of classical music to the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.