जीवनात विशाल दृष्टिकोन हवा : बाभूळगावकर शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:13 AM2019-09-01T00:13:52+5:302019-09-01T00:14:13+5:30
सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.
नाशिक : सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले.
नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने माडसांगवी (ता. नाशिक) येथे शनिवारी (दि. ३१) आयोजित भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती उत्सवातील धर्मसभेत शास्त्रीजी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, महंत संतोषमुनी कपाटे, महंत भीष्माचार्य बाबा, महंत चक्रपाणी बाबा कोठी आदी उपस्थित होते. याप्रसंगी महंत बाभूळगावकर शास्त्री यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या शतकात सर्व समाजांतील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आनंद प्राप्तीसाठी मोहमाया यांचा त्याग करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महंत सुकेणेकर शास्त्री यांनी विचार मांडले.
दरम्यान, श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सवानिमित्त सकाळी देवास मंगल स्नान, भगवत गीता पाठ, आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर संत- महंताच्या हस्ते ध्वजारोहण व सभा मंडपाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक वामनराव आवारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. अर्जुनराज सुकेणेकर यांनी आभार मानले. दरम्यान, सर्व महंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोपीराज शास्त्री सुकेणेकर, राजधरदादा सुकेणेकर, दामोदर अण्णा महानुभाव, महंत गोविंदराज अकुंळनेरकर, महंत अंजनगावकर बाबा, पोपटराव गायकवाड, प्रभाकर कातकाडे आदी उपस्थित होते.
विशेष कार्य सेवा पुरस्कार सोहळा
जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच नागदेवाचार्य विशेष कार्य सेवा गौरव पुरस्कार देऊन अर्जुनराव सुकेणेकर, दौलतराव मोरे, सुखदेव केदारे यांचा गौरव करण्यात आला, तर वामनमुनी अंकुळनेरकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.