आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 09:19 AM2023-11-19T09:19:27+5:302023-11-19T09:20:05+5:30

‘त्यांना एका समाजाची बाजू घेणे शोभते का?’, ‘आम्ही बोलावे एवढी त्यांची लायकी नाही’

War of words over maratha reservation issue; Bhujbal-Jarange will face each other again | आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी (नाशिक) : आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करत असताना छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती आपण केवळ मराठा समाजाची बाजू घेता, हे आपणाला शोभत नाही, अशी टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली.

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसींसाठी ३५ वर्षे लढलो आणि यापुढेही लढेन. त्यामुळे कोणीही अन्याय केला तर सहन करणार नाही असे सांगून  फुले, शाहू, आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज बघा आणि तुम्ही काय करता? तुम्ही एका समाजाची बाजूच कशी घेऊ शकता, असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

मी आजपर्यंत छगन भुजबळ यांना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार समजत होतो. परंतु त्यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत हीन भाषा वापरत टिप्पणी केली. भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. 
- संभाजीराजे छत्रपती, 
माजी खासदार

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जी व्यक्ती सरकारच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, अशा शब्दात मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. 

सातारा येथील गांधी मैदानावर शनिवारी जाहीर सभेत जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली, हे सगळ्यांना माहीत आहे. 

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण गरम होत आहे, पण याचा राजकीय वापर करण्यात येऊ नये. मी हात जोडतो, पण आरक्षणावरून कोणत्याही नेत्याने जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. जातीनिहाय जनगणनेनंतर सर्वांना आरक्षण देण्यात यावे.
- उदयनराजे भोसले, खासदार

 

Web Title: War of words over maratha reservation issue; Bhujbal-Jarange will face each other again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.