वारकऱ्यांना लागली पांडुरंग भेटीची आस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:02 PM2021-06-03T22:02:51+5:302021-06-04T01:14:02+5:30
पेठ : संसाराची सारी दुःखे विसरण्याची एकमेव जागा म्हणजे पंढरीची वारी. हातात पताका, डोक्यावर तुळशी घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात भजन- कीर्तनात तल्लीन होऊन पंढरपुरी विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवण्याची आस धरून वारकऱ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून पंढरीच्या आषाढीवारीला खंड पडला असून, सासुरवाशिणीला माहेरची ओढ लागावी, तशी वारकऱ्यांना वारीची ओढ लागली आहे. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, शासनाने बहुतांश बाबी सुरू करण्याबाबत निर्णय घेतले आहेत. त्यामुळे योग्य शासकीय नियमांचे पालन करण्याच्या अटीवर पंढरीच्या वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी भागातील वारकऱ्यांनी केली आहे.
वारकरी हा पंढरीच्या भेटीचा भुकेला असतो. वर्षानुवर्षे अखंड वारीची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली असल्याने वारकऱ्यांना विठुरायाची ओढ लागली आहे. मिशन अनलॉकमध्ये शासनाने वारीसंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करून वारकरी व पंढरीची भेट घडवून पुण्याचे काम करावे, अशी समस्त वारकरी मंडळीची मागणी आहे.
-ह.भ.प. पंढरीनाथ वालवणे, अध्यक्ष, पेठ तालुका वारकरी महामंडळ.