प्रभाग १३ : शांततेत प्रक्रिया पूर्ण, आज मतमोजणी पोटनिवडणुकीत ४० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:11 AM2018-04-07T01:11:00+5:302018-04-07T01:11:00+5:30
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) झालेल्या पोटनिवडणुकीत ३९.७१ टक्के मतदान झाले. संवेदनशील गणल्या जाणाऱ्या या प्रभागात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) झालेल्या पोटनिवडणुकीत ३९.७१ टक्के मतदान झाले. संवेदनशील गणल्या जाणाऱ्या या प्रभागात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. पहिल्या सहा तासांत अवघे १७ टक्के मतदान झाले होते. मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून न आल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. शनिवारी (दि. ७) सकाळी १० वाजेपासून गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणात आठ उमेदवार होते. त्यात मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरीश लोणारी यांच्यासह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समिना कयूम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समिमा मकसूद खान यांचा समावेश होता. अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. प्रभागात ६१ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यासाठी २०४ मतदान अधिकारी, ९ झोनल अधिकारी, ६८ केंद्राध्यक्ष, ६८ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळच्या वेळी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडतील अशी अपेक्षा होती. परंतु, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. बºयाच मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत अवघे १७.१९ टक्के मतदान नोंदवले गेले. त्यात ४६६० पुरुष, तर ३४५९ स्त्री मतदारांचा समावेश होता. त्यानंतर, दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २५.४२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. सायंकाळी ५.३० वाजता मतदान आटोपले त्यावेळी ४७ हजार २२८ पैकी १८ हजार ७५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अखेरच्या दोन तासांत काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी बघायला मिळाली. दर निवडणुकीत बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्रावर अखेरच्या तासाभरात मतदारांची प्रचंड गर्दी बघायला मिळायची. परंतु, पोटनिवडणुकीत या केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. बुधवार पेठेतील रंगारवाडा शाळेत मात्र गर्दी झाली होती. दिवसभर सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. अखेरच्या टप्प्यात मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आटापिटा दिसून आला.