प्रभाग २९ मध्ये महाकाली चौक यांसह परिसरात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:41 AM2018-09-25T00:41:26+5:302018-09-25T00:41:50+5:30
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवकांनी पहाणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास अभिनव पद्धतीने आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. सिडको भागात दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतानाही संबंधित विभागाकडून याबाबत लक्ष दिले जात नाही. प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक व परिसरातील नागरिकांचे या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात तक्रार दिल्यानंतरही स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आज प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग तसेच रमेश उघडे, दिलीप देवांग यांनी दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात पहाणी केली. यावेळी कल्पना चव्हाण, सुभाष जाधव, विलास भामरे, राजेश सैंदाणे, मीना वैष्णव, हरिभाऊ आहेर, सुभाष जाधव यांसह नागरिक व नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या.
मनपाच्या संबंधित विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभाराबाबत प्रभागात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी कायमच दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रारही नागरिक करीत असतात. दत्त चौकातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास महिलावर्गास बरोबर घेत मनपा कार्यालयावर आंदोलन करणार आहे. - छाया देवांग, नगरसेवक