राज्यात ‘वॉर्ड क्लिनिक’योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:11 AM2019-08-27T00:11:09+5:302019-08-27T00:12:10+5:30
तळागाळातील माणसाला वैद्यकीय सेवा मिळावी. वैद्यकीय उपचाराअभावी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
नाशिक : तळागाळातील माणसाला वैद्यकीय सेवा मिळावी. वैद्यकीय उपचाराअभावी कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच दिल्लीच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर राज्यभरात ‘वॉर्ड क्लिनिक’योजना राबविली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ या आरोग्य विभागाच्या अभियानांतर्गत जिल्हा सरकारी रु ग्णालयात आयोजित मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि.२६) करण्यात आले. यावेळी भुसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती यतिन पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. भुसे यांनी ‘बेटी बचाव’ या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी केस पेपरवर स्टॅम्प उमटवून ‘जनजागृती स्टॅम्प’चे अनावरण केले. यावेळी भुसे म्हणाले, लाभार्थी रु ग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात कुठल्याही आजाराचा रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून वैद्यकीय चमुने प्रयत्नशील रहावे. महाशिबिराअंतर्गत नोंदणी करणाऱ्या रुग्णांच्या उपचारापर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करावे, असे मांढरे म्हणाले.
९० डॉक्टरांचा चमू; दोन हजार रुग्णांची ‘ओपीडी’
जिल्हा रु ग्णालयात मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १६ जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे महाआरोग्य शिबिर राबविले जात आहे. रुग्णांची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत केले जाणार आहे. प्रत्येक विभागामध्ये सात ते आठ विशेष डॉक्टरांचे पथक वैद्यकीय सेवा देणार आहेत. दिवसभरात दोन हजार ४७१ विविध रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
लाभार्थी रुग्णसंख्या अशी...
त्वचारोग : १६२
कर्णविकार : १३५
अस्थिरोग : ३१०
स्त्री-रोग : १३७
दंतविकार : १००
नेत्रविकार : २४८
बालरोग : १८१
मानसिक आजार : ७४