वारकरी संप्रदाय विश्वधर्म व्हावा
By admin | Published: September 20, 2015 11:51 PM2015-09-20T23:51:55+5:302015-09-20T23:52:35+5:30
संतसंमेलनात विचारमंथन
नाशिक : साधुग्राममधील जगद्गुरू स्वामी हंसदेवाचार्य यांच्या जगन्नाथ धाममध्ये संत गुलाबराव महाराज यांच्या शतक समाधी महोत्सवानिमित्त वारकरी संप्रदायाची ओळख देशभरातील भाविकांना व्हावी, यासाठी वारकरी संप्रदायाची परंपरा, उपासना, तत्त्वज्ञान याविषयांवर संतसंमेलनात विचारमंथन झाले. त्यात वारकरी संप्रदाय विश्वधर्म व्हावा, असा सूर उपस्थित संतांकडून व्यक्त करण्यात आला.
वारकरी संप्रदाय विश्व धर्मास पात्र आहे. महाराष्ट्र संतांची भूमी असून, सर्व विषयांचे वाङ्मय स्वरूप त्यात समाविष्ट आहे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे गोविंदगिरीजी महाराज यांनी सांगितले. पंढपूर वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तसेच कीर्तन आणि भजनाची महत्त्वाची परंपरा आहे. सर्व संप्रदायांची उपासना वारकरी संप्रदाय करत असल्याचे रामेश्वरशास्त्री यांनी सांगितले.
संत साहित्य वाङ्मय लोकसंवादी असल्याचे कृष्णदास महाराज लहवितकर यांनी सांगितले. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक याठिकाणीही वारकरी संप्रदायाचे अनुयायी असल्याचे रामदास महाराज बळी यांनी म्हटले. जगन्नाथ धाममध्ये स्वामी हंसदेवाचार्य यांच्या जगन्नाथ धाममध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरा, तत्त्वज्ञानावर विचारमंथन करण्यात आले. संमेलनाला महामंडलेश्वर जनार्दन हरि गिरीजी महाराज, प्रकाश महाराज, महामंडलेश्वर अमृतदासजी महाराज, ईश्वरदासजी महाराज, रामदासजी महाराज, ऋषिकेश महाराज, हिंदू जनजागृती समितीचे चारूदत्त पिंगळे आदि उपस्थित होते.