‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी साकारली वारली पेंटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:44 PM2018-09-29T21:44:55+5:302018-09-29T21:56:41+5:30
नाशिक : उद्यानातील हिरवी झाडी अन् झाडांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली सुंदर अशी वारली पेंटिंग हे दृश्य आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील़महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘कमवा व शिका’ या योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्यातील वारली चित्रकलेची प्रतिभा या भिंतीवर चितारली असून, ही चित्रे विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे़
महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच काम करण्याची संधी मिळावी व या कामातून मिळणारा आर्थिक मोबदला शिक्षणासाठी मिळावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये ‘कमवा व शिका’ ही योजना राबविली जाते़ एचपीटी महाविद्यालयात या योजनेत सहभागी झालेला विद्यार्थ्यांचा एक गट गत दहा दिवसांपासून महाविद्यालयातील उद्यान आकर्षक करण्यासाठी काम करतो आहे़ उद्यानाच्या भिंतीवर वारली चित्रे काढली जात असून, यामुळे महाविद्यालयाच्या उद्यानाच्या आकर्षणात भर पडते आहे़
एचपीटीचे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही़ एऩ सूर्यवंशी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या या मोठ्या उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. या उद्यानातून विद्यार्थ्यांना पायी जाण्यासाठी रस्ते असून, उद्यानाला छोट्या-छोट्या भिंती बांधण्यात आल्या आहेत़ या भिंतींवर कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी प्राध्यापक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या कुवटेकर, सचिन वळवी, अजय महाले, खुशी साळवे, पूनम सोनवणे आणि लोकनाथ जाधव हे वारली पेंटिंग करीत आहेत़ या उद्यानात एका पाण्याचा कारंजाही तयार करण्यात आला असून, या कारंजावरही सुुंदर अशी वारली पेंटिंग काढली आहे़
वारली कलेस प्रोत्साहन
महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार दाखवून ही वारली चित्रे काढली आहेत़ विशेष म्हणजे यातील चार ते पाच विद्यार्थी हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आहेत़ वारली कलेस प्रोत्साहन देण्याबरोबरच उद्यानाचा आकर्षकपणादेखील वाढला आहे़
- प्रशांत देशपांडे, प्राध्यापक, एचपीटी महाविद्यालय