सतर्कतेचा इशारा : गंगापूरमधून लवकरच होणार हंगामातील पहिला विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:52 PM2019-07-29T13:52:43+5:302019-07-29T13:54:58+5:30
नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत ...
नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून सोमवारी (दि.२९) दुपारी १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. हा विसर्ग हळहळु सायंकाळपर्यंत २०००पर्यंत वाढविला जाणार आहे. त्यामुळे होळकर पूलाखालून गोदापात्रात २ हजार ४३८ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गोदाकाठी असलेल्या रहिवाशांना तसेच विक्रेत्यांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आदेश दिले गेले आहे. तसेच गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग झाल्यानंतर होळकर पुलापर्यंत पाणी दीड तासांत पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. होळकर पूलापासून पुढे नदीपात्र उथळ असल्यामुळे पाणी उसळ्या घेऊन अधिक वेगाने टाळकुटेश्वर व लक्ष्मीनारायण पुलाखालून वाहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तत्काळ गोदापात्रापासून सुरक्षितस्थळी निघून जावे, असे आवाहन केले जात आहे. आपली दुकाने, वाहने गोदापात्रापासून तत्काळ काढून घ्यावी असे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. गोदापात्रात वाढलेले पाणी बघण्यासाठी व फोटोसेशन करण्यासाठी कोणीही पुलांवर गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, लक्ष्मीनारायण पुलावर बघ्यांनी गर्दी करू नये, तसेच सेल्फी वगैरे घेण्याचा धोकादायक प्रयत्न करू नये असे आवाहन उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्यास पुलावर उभ्या केलेल्या वाहनांच्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीनही पोलीस ठाण्यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त घारपुरे घाट ते तपोवनापर्यंत नदीकाठालगत व पुलांवर असणार आहे. या हंगामातील हा पहिलाच विसर्ग नदीपात्रात होत आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार ४२२ दलघफूपर्यंत पोहचला आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. सकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे.