हवामान केंद्र : शहरात बुधवारी वादळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:14 PM2020-06-02T19:14:38+5:302020-06-02T19:16:24+5:30
या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला.
नाशिक : अरबी समुद्रात धडकणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यात पहावयास मिळणार आहे. बुधवारी (दि.३) शहरात ताशी ६० किमी इतका वा-याचा वेग राहणार आहे. दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा नाशिक येथील हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामिण भागात वादळी पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान तज्जांनी म्हटले आहे.
‘निसर्ग’ वादळी वा-याची तीव्रता अधिक असून हे मोठे चक्रीवादळ आहे. ‘अम्फान’नंतर अरबी समुद्रात आलेले हे दुस-या क्रमांकाचे तीव्र स्वरुपाचे वादळ असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
शहरासह जिल्ह्यात वादळी वारे वेगाने वाहणार असून जोरदार पाऊसदेखी अपेक्षित आहेत. बुधवारी दुपारपासून वा-याचा वेग शहरात वाढलेला असू शकतो तसेच संध्याकाळी पावसाला सुरूवात होऊ शकते. तसेच गुरूवारी दिवसभर तीव्र व मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा दिला.
तापमानाचा पारा कमालीचा घसरला
शहरातदेखील काही उपनगरांमध्ये पावसाचा शिडकावा सकाळी व सायंकाळी झाला. वारे थंड झाल्याने वातावरणातील उष्मा एकाएकी गायब झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. शहराचे वाढलेले कमाल तापमान ३८ अंशावरून थेट २९ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद पेठरोडवरील हवामान केंद्राकडून करण्यात आली.
‘निसर्ग’ वादळ हे मोठ्या स्वरूपाचे आहे. यामुळे वाºयाचा वेग मुंबईत समुद्रकिनारी ताशी १०० ते १२५ कि.मी इतका असू शकतो. त्यामुळे नाशिकमध्ये साधारणत: ताशी ५० ते ६० कि.मी वेगाने वारे दूपारी वाहण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात बुधवार व गुरूवारी जोरदार वादळी पाऊस अपेक्षित आहे. गारपिट होण्याचा धोका नाही. शेतक्यांनी अधिकाधिक खबरदारी घ्यावी.
- सुनील काळभोर, हवामान तज्ज्ञ, नाशिक हवामान केंद्र