दोन दिवसांमध्ये वादळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:36+5:302021-05-16T04:14:36+5:30
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच रविवार आणि सोमवारी ...
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच रविवार आणि सोमवारी (दि. १६ आणि दि.१७ मे) काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व गुजरात राज्याच्या काही भागात त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ४० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ५० ते ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. विजा चमकताना घराबाहेर, गॅलरीत भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे,धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात अशा प्रकारची दक्षता घेण्याची सूचनादेखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.