जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:49 AM2022-03-07T01:49:05+5:302022-03-07T01:49:21+5:30
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या हवामानावर देखील प्रतिकूल परिणाम जाणवणार आहे. यामुळे मुंबईच्या कुलाबा येथील वेधशाळेने सोमवारपासून (दि.७) बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
नाशिक : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या हवामानावर देखील प्रतिकूल परिणाम जाणवणार आहे. यामुळे मुंबईच्या कुलाबा येथील वेधशाळेने सोमवारपासून (दि.७) बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
एकूणच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावू लागले आहे. रविवारी (दि.६) शहराचे कमाल तापमान ३३.५ अंश इतके तर किमान तापमान १६.१ अंश इतके नोंदविले गेले. शहराच्या वातावरणामध्ये उकाडा वाढत असताना पुन्हा मेघगर्जनेसह काही ठरावीक भागाला अवकाळी पाऊस झोडपण्याची शक्यता पुढील तीन दिवसांत वर्तविली गेली आहे. बदलत्या हवामानाचा फटका सातत्याने कृषी क्षेत्राला बसत आहे. फेब्रुवारीनंतर पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाची टांगती तलवार आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ऐन रब्बीची पिके हाती आलेली असताना अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, मन्नारची खाडी आणि तामिळनाडूसह दक्षिण आंध्रप्रदेश समुद्रकिनाऱ्याजवळ ७ मार्चपर्यंत स्थिती उग्र राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस होऊ शकतो. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह सरींचा वर्षाव होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.