नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:04+5:302021-06-02T04:13:04+5:30
पावसाळ्यात गावठाण भागातील जुनी घरे तसेच धोकादायक अवस्थेतील घरे पडण्याची आणि दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सातपूरगाव, पिंपळगाव बहुला गाव, ...
पावसाळ्यात गावठाण भागातील जुनी घरे तसेच धोकादायक अवस्थेतील घरे पडण्याची आणि दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सातपूरगाव, पिंपळगाव बहुला गाव, गंगापूर गाव आणि चुंचाळे अशा गावठाण भागातील ६१ घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची घरे धोकादायक असून पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सदर घरमालकांनी घरे उतरवून घ्यावीत. काही दुर्घटना घडल्यास संबंधित घरमालकास जबाबदार धरण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमांन्वये या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
पावसाळ्यात महापूर येण्याची शक्यता गृहीत धरून सातपूर विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीकाठावरील राहणाऱ्या ३४२ रहिवाशांना सातपूर विभागीय कार्यालयाने नोटिसा बजावून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन गंगापूर, पिंपळगाव बहुला, सातपूर गावठाण या भागासाठी मदतकार्य, बचावकार्य आणि संरक्षण देण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच नदी काठावरील रहिवाशांना पूर परिस्थितीत आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे.
चौकट==
पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन गंगापूर, पिंपळगाव बहुला, सातपूर गावठाण या भागासाठी मदतकार्य, बचावकार्य आणि संरक्षण देण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. गोदावरी आणि नंदिनी नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी. आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधल्यास तात्काळ मदत मिळू शकेल.
-नितीन नेर, विभागीय अधिकारी, सातपूर