दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:56 PM2020-06-13T21:56:30+5:302020-06-14T01:31:47+5:30

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भागात वीजपुरवठा खंडित झाला.

Washed the next day too! | दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार !

दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार !

Next

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मध्य नाशिकसह उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजता मुसळधार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर वाढल्याने बºयाच भागात वीजपुरवठा खंडित झाला. सलग दुसºया दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तसेच गोदावरीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारपासून शहरात मान्सूनचे आगमन झाले असून, शनिवारी वातावरणात दमटपणा अधिक होता. कमाल तापमान ३१.८ असल्याने दिवसभर नागरिकांना उष्णता जाणवली. मात्र, दुपारी ४वाजेनंतर शहरात मेघ दाटून आले. साडेचार वाजेपासून जुने नाशिक, मध्य नाशिक, पंचवटी, वडाळागाव, नाशिकरोड, कामटवाडे, इंदिरानगर, उपनगर या भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. या भागात दीड तास पावसाचा जोर कायम रहिला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यानंतर शहरात सर्वत्र पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्याने पावसाच्या आगमनाचा परिणाम जाणवला. बाजारात आलेल्या ग्राहकांसह फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. शुक्रवारी मध्यरात्रीदेखील पावसाच्या सरी कोसळल्याने शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण दिसले. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू झाल्याने रस्ते जलमय झाले होते.
--------------------------
मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूप
शहरातील सीबीएस, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूररोडवरील सखल ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे रूप आल्याचे दिसले. काही ठिकाणच्या मोकळ्या भूखंडातही पाणी साचले. यामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या शहरात वाढत असून, साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आजाराची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
-------------------------
श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोर उद्यानालगत असलेला अनेक घटनांचा साक्षीदार पुरातन पिंपळ वृक्ष शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नाही. सदर वृक्ष काळाराम मंदिर पूर्व दरवाजाच्या बाहेर भिंतीवर कोसळला आहे. शुक्रवारी (दि. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वृक्षाभोवती असलेला परिसर पाण्याने भिजला गेला व त्यातच झाडाचा बुंधा मोकळा केल्याने सदर झाड कोसळले.
------------------
वृक्ष कोसळले
बोधलेनगर सिग्नल परिसरात एक वृक्ष कोसळला. त्याआधी सकाळी पंचवटीत काळाराम मंदिरानजीकचा एक वृक्षदेखील उन्मळून पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य राबवून वृक्ष रस्त्यातून बाजूला केले. यासह शहरात विविध भागात झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. फुले, पाने, ओल्या फांद्या रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणी वाहने घसरली.

Web Title: Washed the next day too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक