नदीपात्रातच धुणी-भांडी;
By admin | Published: June 15, 2014 01:38 AM2014-06-15T01:38:15+5:302014-06-15T18:23:25+5:30
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
पंचवटी : गोदावरी नदीत धुणी-भांडी करणे, तसेच निर्माल्य टाकले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. नदीचे प्रदूषण वाढत असले, तरी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नदीपात्रालगत असलेल्या गांधी तलावाच्या भोवताली परिसरातील बेशिस्त महिला तसेच परगावाहून आलेले भाविक स्नान केल्यानंतर कपडे धुतात तसेच निर्माल्य नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. गोदावरी नदीपात्र कायम स्वच्छ राहावे यासाठी मनपाने सफाई कर्मचारी नेमलेले असले, तरी त्यांच्या गैरहजेरीत महिला बिनधास्तपणे धुणी- भांडी करतात, तर भाविक नदीपात्रात साबण लावून अंघोळ करतात. गांधी तलावाच्या दोन्ही बाजूला सर्रासपणे धुणी-भांडी चालत असल्यामुळे सध्या या परिसराला धोबी घाटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीपात्रात धुणी-भांडी करू नये असे सूचना फलक महापालिकेने लावलेले असले, तरी ते नावालाच उरले आहेत. नदीपात्र स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिकेने जनजागृती करण्याची आणि जनतेनेही ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)