वाहनांसाठी व्हावा भुयारीमार्ग
By admin | Published: November 5, 2016 01:33 AM2016-11-05T01:33:37+5:302016-11-05T01:40:54+5:30
द्वारका चौफुली : महामार्ग विभागाच्या प्रस्तावाची गरज; सध्याच्या मार्गाचा व्हावा पुनर्विचार
नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलामुळे द्वारका चौफुलीवर निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आता विविध उपाययोजना हाती घेत आहेत. मात्र, त्याठिकाणी उभारलेला पादचारी भुयारीमार्ग वापराविना पडून आहे, त्यामुळे हा भुयारी पादचारी मार्ग न ठेवता छोट्या हलक्या वाहनांसाठी खुला केला, तर समस्या दूर होऊ शकते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने त्याचा विचार करण्याची गरज आहे.
महामार्गावर उड्डाणपूल साकारल्यानंतर शहरातील वाहतूक समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढली आहे. त्यासंदर्भात विविध आमदारांनी सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने सुधारणा करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार शनिवारी (दि.५) द्वारका चौफुली येथेदेखील सुधारणा करण्यात येणार आहे. द्वारका चौफुली ही अत्यंत महत्त्वाची असून, मुंबई-आग्रा महामार्गाला नाशिक-पुणे महामार्ग जोडला जातो. त्यातच नाशिकरोड येथे जाणारे-येणारे प्रामुख्याने याच मार्गाचा वापर करतात. महामार्गाला समांतर रस्ते, महामार्ग बसस्थानक तसेच त्याच्याविरुद्ध दिशेला म्हणजे पंचवटीकडेदेखील जाण्याची सोय आहे. परिसरात शाळा, शासकीय कार्यालये, बस थांबे आणि व्यापारी संकुले असल्याने वाहनांबरोबरच पादचाऱ्यांची गर्दी असते. गर्दीच्या वेळी वाहतुकीचा चक्रव्यूह भेदून जाणे दिव्यच असते. उड्डाणपूल तयार करताना महामार्ग प्राधीकरणाने पुलाखालील वाहतूक सुकर व्हावी यासाठी द्वारका पोलीस चौकी ते रस्ता ओलांडून हनुमान मंदिराजवळ निघणारा भुयारी पादचारी मार्ग तयार केला आहे; मात्र सुरुवातीपासूनच तो अडचणीचा ठरत आहे. आधी या भुयारीमार्गात लाइट नव्हते ते असले तरी त्याचा वापर कोणी करीत नाही, सामान्यांना असुरक्षित वाटणाऱ्या या मार्गाचा ताबा व्यसनी मंडळींनी घेतला, येथे प्रातर्विधीही केले जात असल्याने आता भुयारीमार्ग जवळपास बंदच आहे. त्याचा वापर वाढावा आणि भुयारी मार्गातून बाहेर पडताना असलेल्या ठिकाणी वाहनांना वळसा घालताना होणारी अडचण लक्षात घेऊन भुयारीमार्गाचे काहीसे स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या मानसिकतेचा विचार केला तर कितपत त्याचा उपयोग होईल या विषयी शंका आहे. त्यामुळे पुण्याला जाताना नाशिक फाटा तसेच पिंप्री-चिंचवड येथे ज्या पद्धतीने वाहनांसाठी बायपासची सोय केली आहे, त्याच धर्तीवर भूयारीमार्गातून हलक्या मोटारी जाण्या येण्याची सोय केली तरी अधिक सोयीचे ठरू शकते. त्यामुळे प्राधिकरणाने त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)