मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक

By अझहर शेख | Published: September 9, 2023 06:14 PM2023-09-09T18:14:39+5:302023-09-09T18:14:58+5:30

सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.

Watch out kids, drugs are being sold in college premises Youth arrested while selling MD | मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक

मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक

googlenewsNext

नाशिकरोड: सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीतून ५० हजार रुपयांची १२.५ ग्रॅम इतकी एम. डी. पावडर जप्त करण्यात आली आहे. अल्पवयीन मुले या नव्या अमली पदार्थाच्या आहारी जात असून, दिवसेंदिवस त्यांच्याभोवती एम. डी.चा फास अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. यामुळे अशा कारवाया सातत्याने होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

एम. डी. पावडर, कुत्ता गोली, व्हाइटनर, बटन गोली, गांजासारख्या विविध अमली पदार्थांची सर्रासपणे विक्री नाशिकरोडसह विविध भागांमध्ये केली जात आहे. महाविद्यालयीन युवक-युवती यासारख्या अमली पदार्थांच्या व्यसनात अडकत चालल्याचे दिसून येते. मागील काही महिन्यांपासून या घातक अशा अमली पदार्थांच्या विक्रीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, असे नागरिकांनी सांगितले. शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये सर्रासपणे अशा अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे व सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईसाठी रवाना केले.

गुरूवारी (दि. ७) दुपारी सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सापळा रचून संशयित गणेश संजय शर्मा (२०, रा. सामनगाव रोड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच दोन मोबाइल, १ हजार ७०० रुपये असा एकूण ७१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयित गणेश शर्मा याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आता अमली पदार्थविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
झोपडपट्ट्या बनले केंद्र
शहर परिसरामध्ये युवा पिढी एम. डी. व कुत्ता गोळीसारख्या अमली पदार्थांमुळे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेसोबत इतर प्रश्नदेखील गांभीर्याने निर्माण होऊ लागले आहेत. शरीराला अत्यंत घातक असलेल्या एम. डी., कुत्ता गोळी, गांजा आदी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील काही झोपडपट्टी परिसर व इतर भागांत अशा अमली पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. हे अमली पदार्थ शहरात पुरविणाऱ्या मुख्य पुरवठादारापर्यंत पोलिसांनी पोहोचण्याची गरज आहे.

Web Title: Watch out kids, drugs are being sold in college premises Youth arrested while selling MD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.