हेलिकॉप्टरद्वारे सभास्थळावर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:42 AM2019-09-18T01:42:32+5:302019-09-18T01:43:06+5:30
तपोवनमधील साधुग्रामच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळावर मंगळवारपासूनच सुरक्षा यंत्रणांनी सूक्ष्म नजर केंद्रित केली आहे. मंगळवारी सायंकाळी दोन हेलिकॉप्टरद्वारे तपोवन-साधुग्राम परिसरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला.
नाशिक : तपोवनमधील साधुग्रामच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळावर मंगळवारपासूनच सुरक्षा यंत्रणांनी सूक्ष्म नजर केंद्रित केली आहे. मंगळवारी सायंकाळी दोन हेलिकॉप्टरद्वारे तपोवन-साधुग्राम परिसरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला. या भागात काळ्या रंगाचे हेलिकॉप्टरने सातत्याने घिरट्या घातल्याचे दिसून आले.
मोदी यांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय सुरक्षा दले सतर्क झाले आहेत. मोदी यांना ७ स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या नाशिक दौऱ्याविषयी सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून चोख सुरक्षेचे नियोजन केले जात आहे. दस्तूरखुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंगळवारी शहराच्या पोलीस अकादमीत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. त्याचप्रमाणे मोदी यांच्या वाहतुकीपासून सर्वच प्रकारे सुरक्षेची खास जबाबदारी पार पाडणाºया विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडोदेखील सभास्थळासह ओझर विमानतळ ते तपोवनापर्यंतच्या रस्ते मार्गाच्या सुरक्षेचा आढावा घेत आहे.
मोदी यांच्या सुरक्षेविषयी विशेष काळजी पोलीस प्रशासनासह सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जात आहे. तपोवनातील साधुग्रामसह सर्व परिसरात संरक्षण खात्याचे हेलिकॉप्टर वगळता अन्य सर्व प्रकारच्या हवाई साधनांनाही ‘आकाशबंदी’ करण्यात आली आहे. सभेचा परिसरत सुरक्षा दलाच्या नजरेत असून, येथे येणारी वाहने, लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच सभेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला गेला आहे.
एसपीजी, एसपीयू अन् फोर्स-१चे कमांडो
मोदी यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली येथील विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडो तैनात राहणार आहे. तसेच सभास्थळी यांसह विशेष सुरक्षा गट, मुंबई आणि फोर्स-१ मुंबईचे विशेष कमांडोही बंदोबस्तावर राहणार आहेत. कोणत्याही प्रकारे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद््भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
धातुशोधक यंत्रांची उभारणी
साधुग्राममध्ये गुरुवारी होणाºया मोदी यांच्या सभेसाठी येणाºया प्रत्येक नागरिकाला सभामंडपात धातुशोधक यंत्राद्वारे तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी मुंबई, सांगलीसह अन्य ठिकाणांहून आलेल्या पोलिसांनीही सोबत धातुशोधक यंत्रणा आणली आहे. सभेच्या सर्व प्रवेशद्वारावर धातुशोधक कमानी उभारल्या जाणार आहेत. एकूणच सभेसाठी येणाºया प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेच्या कारणास्तव कसून चौकशी करण्यात येणार आहे.