पाणी अडवा पाणी जिरवा : लायन्स क्लब आॅफ प्राइडचा हेतू साध्य
By Admin | Published: October 31, 2014 10:11 PM2014-10-31T22:11:59+5:302014-10-31T22:17:34+5:30
पांझण नदीपात्रातील बंधाऱ्यात पाणी
मनमाड : येथील लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइड या संस्थेच्या पुढाकाराने पल्लवी मंगल कार्यालयासमोरील पांझण नदीपात्रात बांधलेल्या सिमेंट प्लग बंधाऱ्यात पाणी जमा होऊन बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने क्लबचा ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा हेतू साध्य झाला आहे. या पाण्यामुळे परिसरातील विंधनविहिरींची पाण्याची पातळीवर आली असून, पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात झाली आहे.
मनमाड येथे लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइडचे अध्यक्ष हेमराज दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या अभियांनातर्गत सुमारे १३ लाख रुपये खर्चाच्या आरसीसी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे या ठिकाणच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्यात आल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईमध्ये होरपळणाऱ्या मनमाड शहरात या उपक्रमामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मनमाड प्राइडचे पदाधिकारी हेमराज दुगड, दिशेन मुनोत, दिनेश आव्हाड, दत्तात्रय सूर्यवंशी, संदेश बेदमुथा, नाविद शेख, शैलश बेदमुथा, नईम शेख, संजय मुथा, दीपक पारीक, मुकेश गांधी, प्रवीण अव्हाड, सुमतीलाल बरडिया, मंगेश सगळे अनिल दराडे, दीपक मकवाणे, निर्मल भंडारी यांच्यासह अन्य लायन्स सदस्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
पांझण व रामगुळणा नदीपात्रात गेल्या ५० -६० वर्षापासून साचलेला शेकडो टन गाळ लोकसहभागातून मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकाराने काढण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या बांधकामानंतर आता या भागात जॉगिंग ट्रॅकसह गार्डन ,पिकनिक स्पॉट उभारण्याचा समितीचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)