आदिवासी शाळेत ‘वॉटर बेल’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 02:39 PM2019-11-21T14:39:25+5:302019-11-21T14:39:38+5:30
पेठ - तालुक्यातील गढईपाडा येथील प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ हा नवीन उपक्र म सुरू करण्यात आला आहे. केरळ राज्याच्या ...
पेठ - तालुक्यातील गढईपाडा येथील प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ हा नवीन उपक्र म सुरू करण्यात आला आहे.
केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय वेळात मुलांना दिवसभरातून लहान सुटी, मोठी सुटी दिली जाते. त्यामध्ये आता एका नव्या सुटीची भर टाकण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याची आठवण करून देण्यासाठी शाळेची घंटा वाजवली जाते. घंटा वाजल्यावर मुले एकत्रित बसून पाणी पितात. यामुळे मुलांना भरपूर पाणी पिण्याची सवय लागली असून उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे असल्याचे शिक्षक मनोहर जाधव यांनी स्पष्ट केले. गढई पाड्याच्या या अभिनव उपक्र माचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव यांनी कौतूक केले.
----------------------
शाळेत येणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होते. पुरेशा प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते म्हणून शाळेत मुलांसाठी जेवणाबरोबर पाणी पिण्यासाठी स्वतंत्र घंटा दिली जाते. या उपक्र माची मुलांना एक चांगली सवय लागली असून स्वत: बरोबर घरातील सदस्यांपर्यंत मुले हा संदेश पोहच करतात.
- मनोहर जाधव, शिक्षक, गढईपाडा