दहा दिवसांपासून पाणी बंद
By admin | Published: February 8, 2017 11:55 PM2017-02-08T23:55:49+5:302017-02-08T23:56:05+5:30
पांगरी : मनेगावसह १६ गाव पाणीपुुरवठा योजना अडचणीत
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पूर्वर् भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगरी गावास गेल्या दहा-बारा दिवसांपासून पिण्याचा पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पांगरी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता; मात्र गेल्या पाच वर्षांत पाऊस झाला नसल्याने फेबु्रवारी महिन्याच्या प्रारंभीच नदी-नाले व बंधाऱ्यातील पाणी आटले असून, ते कोरडेठाक पडले आहे. गावची सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदीच्या पात्रात आहे. या विहिरीनेही तळ गाठला आहे. गेल्या महिन्यात दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता; मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळपाणीपुरवठा योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. या
भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; मात्र उर्वरित भाग गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तहानलेला आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुुरवठा सुरळीत करून पांगरीकरांची टंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)