पाणी पेटले : पार नदीपात्रातच झाली पाणी परिषद
By admin | Published: January 25, 2015 11:19 PM2015-01-25T23:19:13+5:302015-01-25T23:19:28+5:30
दमणगंगा प्रकल्पाविरोधात एल्गा
केंद्र शासनाच्या दमणगंगा-पिंजाळ, नार-पार प्रकल्पात पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीचा समावेश करण्यात आला असून, नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींना देशोधडीला लावण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत शिवसेनेसह आदिवासी सेना व नार-पार संघर्ष समितीच्या वतीने जोरदार विरोध करत थेट पार नदीपात्रात पाणी परिषद घेऊन विरोध दर्शविण्यात आला आहे़ यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात आता आदिवासींनी उडी घेतल्याने दमणगंगेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत़
ज्या प्रकल्पावरून दोन महिन्यांपासून राज्यात धुसपुस सुरू आहे, त्या प्रकल्पातील दमणगंगा ही नदी पेठ तालुक्यात उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते तसेच सुरगाणा तालुक्यातून वाहणारी नार-पार नदीही पेठ तालुक्यातूनच वाहत जाते़ या नदीवर झरी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमेवरील आदिवासींनी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली झरी परिसरातील पार नदीपात्रात पाणी परिषद
घेतली़
यावेळी महाले यांनी सांगितले की, झरी येथील प्रकल्पाची आखणी करताना शासनाने स्थानिक जनतेला अंधारात ठेवले असून, या प्रकल्पामुळे मूळ आदिवासीच विस्थापित होणार असल्याने शासन याची जबाबदारी घेणार का, असा सवाल केला जात आहे़ महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी अडवून त्यावर गुजरात राज्य सुजलाम् सुफलाम् करण्याचा घाट घातला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील जनता मात्र दुष्काळात होरपळत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे़ यामुळे या प्रकल्पाला स्थानिक आदिवासींचा पूर्ण विरोध असल्याने शासनाने बळजबरीने प्रकल्प सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला़ इंकलाब झिंदाबादचा नारा देत नार-पार नदी खोऱ्यात आदिवासींनी पुकारलेला एल्गार प्रकल्पाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचे दिसून येते़
यावेळी माजी आमदार धनराज महाले, पि़ प़ सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित, आदिवासी सेनेचे केंद्र अध्यक्ष डॉ़ पंकजकुमार पटेल, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, नार-पार संघर्ष समितीचे रणजित देशमुख, रामदास वाघेरे, विलास अलबाड, मोहन कामडी, हिरामण गावित यांच्यासह पेठ, दिंडोरी व सुरगाणा तसेच गुजरात सिमेवरील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)